पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोचून झटून काम करा. आगामी निवडणुका (Election) लक्षात घेऊन कामे करा. आता गाफील राहू नका, हि आरपारची लढाई आहे, पक्षाची ताकद दाखवून देण्याची आता गरज आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बुधवारपासून पुण्यात विभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट व वडगाश शेरी येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकीसाठी केवळ संबंधित विभागांच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. त्याव्यतिरीक्त अन्य कोणालाही बैठकीच्या ठिकाणी येऊ न देता गुप्तता पाळण्यात आली.
केसरीवाडा येथे सकाळी अकरा वाजता ठाकरे यांची बैठक सुरू झाली. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणुकांना कसे सामोरे जायचे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरीकांची कामे करण्यास कसे प्राधान्य द्यावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सुचनाही ऐकून त्याची नोंदही घेतली. हि बैठक झाल्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळकांच्या संग्रहालयास भेट दिली. तसेच श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का ?
मनसे-भाजपचे मनोमिलन होत असल्यामुळे भविष्यात पक्ष भाजसोबत जाणार काय ? असा प्रश्न एका पदाधिकाऱ्याने विचारला. त्यावेळी "मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का, आपण आपल्या ताकदीवर लढायचे, पक्षाच्या सुचनांचे पालन करा, कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल' अशा शब्दात संबंधित पदाधिकाऱ्याला सुनावले.
कोणी असो, नसो पक्ष कायम राहणार
पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पुर्वसंध्येलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ठाकरे यांच्या विभागनिहाय बैठका सुरु झाल्या. केसरीवाड्यातील बैठकीमध्ये ठाकरे यांनी "पक्षात कोणी असो, नसो मला फरक पडत नाही, हा पक्ष कायम राहणार आहे.' असे अशा शब्दात पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
राज ठाकरेंनी ठेवले बाळाचे नाव
मुळचे परभणी येथील व सध्या आंबेगाव येथे राहणाऱ्या निशांत व विशाखा कमळू या दाम्पत्याने ठाकरे यांची भेट घेतली. निशांत हे मनसेचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी त्यांच्या चार महिन्यांच्या बाळाला ठाकरे यांनी नाव ठेवावे, अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी ठाकरे यांनी बाळाला "यश' नाव ठेवा, असे सांगत बाळाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वादही दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.