पुणे : ‘नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज’ने (एनएबीएल) ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणारी प्रयोगशाळा म्हणून मानांकनाने गौरविले आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही ‘एनएबीएल’कडून प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र मिळवणारी राज्यातील एकमेव लॅबोरेटरी ठरली आहे.
क्लिनिकल सर्व्हिस लॅबोरेटरीमध्ये जीवरसायनशास्त्र, पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागांच्या प्रयोगशाळा येतात. या प्रयोगशाळेत तपासण्यात येणाऱ्या चाचण्यांची गुणवत्ता व त्यासाठी राबविली जाणारी यंत्रणा कशी कार्यरत आहे, चाचण्यांचे नमुने घेणे, रिपोर्ट देणे व रिपोर्टची माहिती ठेवणे या सर्व बाबी तपासून ‘एनएबीएल’ची टीम प्रमाणपत्र प्रदान करते.
या मान्यतेमुळे प्रयोगशाळेमधून दिल्या जाणाऱ्या अहवालांना विशेष महत्त्व असते. गुणवत्तेच्या कडक निकषांमुळे रुग्ण निदान व उपचारांसाठी यामुळे साह्य होणार आहे. यासाठी जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोमनाथ सलगर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते व पॅथॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. लीना नकाते व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
ससूनच्या प्रयोगशाळेत दररोज जीवरसायनशास्त्राच्या आठ ते दहा हजार तपासण्या होतात. यामध्ये रक्त, ग्लुकोज, युरिया, बिलिरुबीन, लघवी, अशा किडनी, लिव्हर यांच्या तपासण्या होतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोनासारख्या महत्त्वाच्या चाचण्या होतात. ही प्रयोगशाळा २४ तास चालू असते. याचा फायदा रुग्णांच्या निदानासाठी होईल. या मानांकनाने प्रयोगशाळेची गुणवत्ता व विश्वासार्हता वाढते.
एनएबीएलसाठी आम्ही अर्ज केला होता. जूनमध्ये तपासणी झाली आणि ११ सप्टेंबरला प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र देताना विविध निकष पाहिले जातात. त्यात रुग्णांचे नमुने कसे गोळा करतो, ते प्रयोगशाळेत कसे आणतो, त्यांची तपासणी कशी होते, याची काटेकोर नियमानुसार तपासणीची क्वालिटी पॉलिसी ठरवलेली आहे. इतकेच नव्हे, तर तो अहवाल वेळेत फिजिशियनपर्यंत पोहोचतो का, हे सर्व तपासून नियमानुसार असल्यानंतरच मानांकन मिळते.
- प्रा. डॉ. सोमनाथ सलगर, विभागप्रमुख, जीवरसायनशास्त्र विभाग, ससून रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.