पुणे : आपल्याकडच्या उत्तम दर्जाच्या द्राक्षांचे साऱ्या जगाला वेड आहे, तर आपणाला विदेशी वायनरी विश्वाचे; या वेडामुळेच बारामती, बॉर्दो, कोनॅक आणि श्रीरामपूर असा चौकोन सांधला गेला आणि त्यामुळे तिकडच्या अफाट वायनरी उद्योग विश्वाची ओळख झाली. या सर्व घटनांचे कर्ते-करविते होते अमित केवल पाटील. या मराठी माणसाचा प्रवास तरुणांसाठी दिशादर्शक आणि प्रेरक ठरणारा आहे.
बॉर्दो म्हणजे फ्रान्समधील छोटे शहर; पण ते आहे "वाइन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड', म्हणजेच वैश्विक वाइन केंद्र. त्याकडे एक मराठी तरुण आकर्षित झाला आणि तेथे जाऊन त्याने स्वत:चे साम्राज्य उभे केले. एवढेच नाही, तर वायनरीमध्ये नेमके काय प्रयोग होत आहेत हे आणखी मराठी बांधवांना समजावे म्हणून त्याने बारामती, नाशिक आदी भागांतील द्राक्ष उत्पादकांना सोबत घेऊन बॉर्दोची सफर घडवून आणली. तिचे नामकरण केले होते "बारामती ते बॉर्दो'.
अमित पाटील यांनी फ्रान्सच्या वायनरी उद्योगावर "अमिट' ठसा उमटवला. आज ते कोनॅक येथील प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांच्या मालकीची वायन फॅक्टरी आणि सुमारे अडीचशे एकरांवर द्राक्ष बाग आहे. कच्च्या मालासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये म्हणून बागदेखील घेतली. त्यांचा फ्रान्सपर्यंतचा प्रवास सुरू झाला तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, श्रीरामपूरमधून. 1998 पर्यंत त्यांचे शिक्षण श्रीरामपुरातच झाले. नंतर ते पुण्यात आले आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून अल्कोहोल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले. पुढे पुण्यातच एमबीएची पदवी मिळवली आणि एका कंपनीच्या विक्री विभागात रुजू झाले. नोकरीत दररोजचे काम सारखेच. नवे काही नाही. त्यामुळे त्यांचे मन रमेना. फ्रान्समधील वायनरी उद्योगाबद्दल त्यांनी वाचले होते. त्या क्षेत्रात नवे काही शिकावे म्हणून त्यांनी 2005 मध्ये मायदेश सोडला. तेथे त्यांना जगाचा कॅनव्हास पाहायला मिळाला. वायनरी क्षेत्रातील संधी खुल्या झाल्या आणि अनुभव घेण्यासाठी त्यांनी एका स्थानिक वायनरीमध्ये नोकरी स्वीकारली. त्याचा किस्साही मोठा रंजक आहे.
फ्रान्समध्ये ठराविक श्रेणींमध्ये स्थानिकांनाच नोकऱ्या देण्याबाबत कडक कायदा आहे. त्यामुळे अमित यांना नोकरी मिळणे कठीण होते. परंतु त्या वायनरी कंपनीचा मालक अमित यांचे कष्ट आणि प्रामाणिकपणा यावर फिदा झाला होता. त्यानेच यातून मार्ग काढला. सहायक व्यवस्थापक पद निर्माण केले आणि त्याची वृत्तपत्रात जाहिरात दिली. "..., फ्रेंच आणि हिंदी भाषा येणे आवश्यक - कारण उमेदवाराला भारतीय ग्राहकांशी संवाद साधणे आवश्यक आहे...' असा उमेदवार स्थानिक पातळीवर मिळणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे अमित पाटलांची नोकरी पक्की झाली. कायदेशीर बाबी पूर्ण करून ते रुजू झाले.
मात्र अमित हे नोकरीमध्ये रमणारे नव्हतेच. दोन वर्षांचा अनुभव घेऊन त्यांनी स्वत:चे "ट्रेडिंग ऑफिस' सुरू केले. त्यामुळे जगाच्या वाइन मार्केटची माहिती मिळाली आणि स्वत: उत्पादन क्षेत्रात उतरण्याचा निश्चय करत 2008 मध्ये कोनॅक येथे वायनरी विकत घेतली. विदेशी व्यक्तीने तेथे मालमत्ता घेणे खूपच कठीण आहे. अमित सांगतात, ""स्वत:ची जमीन वा अन्य मालमत्ता विदेशी व्यक्तीला विकण्यास फ्रेंच सहसा तयार होत नाहीत. त्यात कायदाही कडक आहे. ज्याची कंपनी आणि जमीन घ्यायची होती त्याने माझी पूर्ण चौकशी केली. दिला जाणारा मोबदला ब्लॅक मनी तर नाही ना, याचीही खातरजमा केली. कारण तेथे उत्पन्नाचा स्रोत सांगावाच लागतो. केवळ जादा पैसे मिळतात म्हणून कोणी ते घेत नाही आणि याला खरंच प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा ना हेदेखील तपासले गेले. तेव्हाच कुठे आमचा व्यवहार झाला.''
कोनॅक हे फ्रान्समधील निमशहरी गाव असले, तरी वाइन उत्पादनात बऱ्याच कंपन्या आहेत. वाइनचे गावावरूनच "कोनॅक' नाव पडले. तो जगप्रसिद्ध ब्रॅंड बनला आहे. 2008 मध्ये भारतातही वाइन धोरण निश्चित झाल्याने उद्योगासाठी हे क्षेत्र खुले झाले आणि अमित पाटलांनी आपल्या मूळगावी म्हणजे श्रीरामपूर येथेही 2009 मध्ये वायनरी सुरू केली. आज घडीला तेथून दरवर्षी सुमारे एक लाख बॉटल वाइनची युरोपात निर्यात होते, तर कोनॅकच्या फॅक्टरीतून पाच लाख बाटल्यांची 15 देशांमध्ये निर्यात होत आहे. कोनॅकची बाग आणि फॅक्टरीमध्ये सर्व यंत्रणा स्वयंचलित आहे, त्यामुळे अवघ्या 16 लोकांमध्ये पाटील हा सारा पसारा यशस्वीपणे चालवतात.
टाटा, मल्ल्या आणि फ्रान्स
टाटांनी फ्रान्सची प्रसिद्ध स्टील कंपनी कोरस 2008 मध्ये विकत घेतली. त्याच वर्षी विजय मल्ल्याने तेथील स्पिरिट फॅक्टरी खरेदी केली होती. मराठी तरुण अमित पाटीलही त्या वेळी वाइन फॅक्टरी खरेदी करण्याच्या प्रयत्नात होते आणि कोनॅक येथे त्यांना यश मिळाले. हा विलक्षण योगायोग होता. फ्रान्समध्ये काम करायचे असल्यास स्थानिक भाषा येणे सक्तीचे आहे. पाटील यांना फ्रेंच भाषा शिकणे खूप अवघड जात होते. त्यामुळे एका क्षणी फ्रान्स सोडण्याच्या निर्णयाप्रत आलेले अमित पाटील आज तेथे घट्ट पाय रोवून यशस्वी उद्योजक बनले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.