Black Magic : उमेदवारांवर जादूटोणा, भानामती ! नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील धक्कादायक प्रकार उघड

नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार झाल्यामुळे या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपात निषेध केला आहे.
Black Magic : उमेदवारांवर जादूटोणा, भानामती ! नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील धक्कादायक प्रकार उघड
Updated on

नारायणगाव - येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीला वेगळे वळण लागले असून सरपंच पदाच्या महिला उमेदवार व सदस्य पदाचे दोन उमेदवार यांचे फोटो काळ्या बाहुलीला लावून, फोटोवर व लिंबावर टाचण्या टोचून, कुंकू, हळद लावून जादूटोणा, भानामती करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अनिकेत अविनाश कोऱ्हाळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान मागील 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानाच्या आदल्या दिवशी याच प्रकारची घटना घडली होती.

नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार झाल्यामुळे या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपात निषेध केला आहे. बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा.अशी मागणी दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी केली आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी श्री.मुक्ताई - हनुमान ग्रामविकास व श्री.मुक्ताई - हनुमान ग्रामविकास परिवर्तन हे दोन पॅनल तयार करण्यात आले आहेत. या दोन पॅनल मध्ये सरळ व अटीतटीची लढत होत आहे. सदस्यांच्या सतरा जागांसाठी सहा प्रभागातून पस्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री.मुक्ताई - हनुमान ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलच्या डॉ. शुभदा वाव्हळ व श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांच्यात सरळ लढत होत आहे. ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पॅनेलचे प्रमुख व उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. सोशल मीडिया व इतर माध्यमाद्वारे ग्रामपंचायतच्या गैरकारभाराचे पुरावे सादर करण्यात आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद झाला. त्यानंतर उमेदवारांनी गाठीभेटी सुरू केल्या. मतदारांना दोन ते तीन हजार रुपयांचे वाटप केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आज सकाळी सदस्य पदाच्या उमेदवार सारीका कोऱ्हाळे - सोनवणे यांच्या सहजीवन हॉटेलच्या शटर जवळ पाटी आढळून आली.

पाटी मध्ये दहा ते पंधरा टाचण्या टोचलेले लिंबू ठेवून सारीका यांच्यासह सदस्य पदाचे उमेदवार प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर व सरपंचपदाच्या उमेदवार छाया केदारी यांचे फोटो काळ्या बाहुलीला चिटकवून त्यावर टाचण्या टोचण्यात आल्या होत्या. फोटोवर हळद-कुंकू वाहण्यात आले होते.

ही घटना समजतात स्थानिक नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. याबाबतची माहिती प्रचार प्रमुख रोहिदास केदारी यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार केदार यांनी भानामती करण्यासाठी वापरलेले साहित्य नदीपात्रात टाकून दिले. त्यानंतर याबाबतची तक्रार अनिकेत कोऱ्हाळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत याच प्रकारे येथील मुख्य बाजारपेठेतील व जुन्नर रस्त्यावर रस्त्यावर टाचण्या टोचलेली लिंबे टाकण्यात आली होती. नारायणगाव सारख्या प्रगत असलेल्या गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याची ही घटना घडत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या बाबत

संतोष खैरे (प्रमुख : श्री.मुक्ताई - हनुमान ग्रामविकास पॅनल) म्हणाले स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेची तपासणी करुन या घटनेचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे.

रोहिदास केदारी (प्रमुख : श्री. मुक्ताई - हनुमान परवर्तन ग्रामविकास पॅनल) पराभव दिसू लागल्याने मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर केला जात आहे. मागील निवडणुकीत सुद्धा अशी घटना झाली होती. या घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य तपास करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.