नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी (आर्वी) व खोडद येथील शेतकरी कुटुंबातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा (नाव बदलून) विवाह लावून दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या टोळीतील बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून जेरबंद केले. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय-३५, राहणार मुरंबी शिरजगाव, तालुका-त्रंबकेश्वर, जिल्हा-नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय-३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय-२३, दोघेही राहणार राहणार अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जिल्हा नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय-४६, राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय-६४, राहणार कुरकुटेवाडी, बोटा, ता.संगमनेर, जि. अहमदनगर), बाळू गुलाब सरवदे (वय-४१, राहणार गुंजाळवाडी, ता. जुन्नर ,जि. पुणे) या आरोपींना आज सायंकाळी अटक केली आहे.
आरोपींनी संगनमत करून जयश्री काळू घोटाळे हिचा सागर प्रभाकर वायकर (वय-३३, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) यांच्याशी १० मे २०२३ रोजी जुन्नर येथे तर हारीश बाळशिराम गायकवाड (वय-३५,राहणार खोडद, ता. जुन्नर) यांच्याशी २८ मे २०२३ रोजी आळंदी येथे विवाह लावून दिला होता. सागर वायकर यांच्याशी विवाह लावताना नवरी मुलगी जयश्री काळू घोटाळे हिचे नाव संध्या विलास बदादे (वय-२३) असे तर हारीश गायकवाड यांच्याशी विवाह लावताना अश्विनी रामदास गवारी (वय-२५) असे सांगण्यात आले होते.
विवाह जमवण्यासाठी या टोळीने वायकर यांच्याकडून एक लाख तिस हजार रुपये रोख तर हारीश गायकवाड यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले होते. लग्न लावल्यानंतर बनावट नवरी मुलगी धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहत असे. त्यानंतर बनावट मावशी मीरा बंसी विसलकर ही नवरी मुलीला माहेरी घेऊन जात. त्यानंतर नवरी मुलगी दागिन्यासह फरार होत असे. या बाबतची तक्रार सागर वायकर व हारीश गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात २ जून २०२४ रोजी दिली होती.
याच प्रकारे आळेफाटा येथे सुद्धा एका तरुणाची फसवणूक झाली होती. गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे सो, उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार विनोद धुर्वे, केंद्रे, काठमोरे, बांगर, दरवडे यांचे पथकाने नाशिक, संगमनेर भागातून अटक केली. याप्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.