केंद्र सरकारने पहिल्या १०० दिवसांत पुण्याला भरभरून मदत केली आहे. लोहगाव विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्या असून वंदे भारत रेल्वे सुरू झाली. स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोला मंजुरी मिळाली, यासह पायाभूत सुविधांसाठी निधी मिळाला.
पुढील पाच वर्षांच्या काळात पुण्याच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील आणि शहराची भरभराट होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी ३.० सरकारने नुकताच १०० दिवसांचा कार्यकाल पूर्ण केला. त्यानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.
खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून गेल्यानंतर मला थेट सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे गेल्या १०० दिवसांत या दोन्ही खात्यांचा कारभार हाकताना अनेक गोष्टी नव्याने शिकण्याची संधी मिळाली.
दोन्ही मंत्रालयांच्या बैठका घेणे, संसदेच्या अधिवेशनात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयारी करणे आव्हानात्मक होते. पण आता आत्मविश्वास वाढला आहे. पुण्याचा महापौर म्हणून काम करताना केवळ एका शहराचा विचार करत होतो. पण आता दोन मंत्रालयांचे कामकाज पाहताना संपूर्ण देश डोळ्यासमोर येतो. तरीही प्राधान्याने पुण्याकडे लक्ष आहे.
केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाचे कामकाज करत आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार क्षेत्राची पाळेमुळे रोवली गेली आहेत. पण अन्य राज्यांत सहकारक्षेत्राचा विस्तार झाला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या १ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत.
त्यातील ७० ते ७२ हजार सोसायट्यांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पण उर्वरित सोसायट्यांचे काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच देशभरात २ लाख सोसायट्या स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या सोसायट्या स्थापन झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून डेअरी,
मत्सव्यवसाय, सीएनजी पंप, पेट्रोल पंप, रेल्वे व विमानाचे तिकीट केंद्र अशा २१ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल. गेल्या १०० दिवसांत देशभरात या कामासाठी प्रवास झाला आहे. सहकारातून सहकार योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांना गती दिली जाणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना विमानातून प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने उडान योजना सुरू केली आहे. ही योजना नागरिकांच्या पसंतीच उतरली आहे. त्याचप्रमाणे देशाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याचा वापर करून विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीची मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यात आली आहे.
देशभरात विमानसेवेला प्रतिसाद मिळत असल्याने केंद्र सरकारने १२०० विमानांची ऑर्डर दिली आहे. देशात नवीन विमानतळ सुरू केले जात आहेत. छोटी शहरे विमानसेवेशी जोडून प्रवास वेगवान करण्यासाठी प्रयत्न आहेत. देशात २६९ नवे हवाई मार्ग सुरू केले आहेत. हा प्रवास कमी तिकिटीत उपलब्ध व्हावा, यासाठी कंपन्यांना होणाऱ्या नुकसानीचा भार सरकार उचलणार आहे.
लोहगाव विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू झाले. विमानांच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यास संरक्षण विभागाकडून मान्यता मिळाली. ओएलएस सर्वेक्षणास गती.
या कामासाठी राज्य सरकारकडून भूसंपादन होणे आवश्यक. त्यासाठी राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २० टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए प्रत्येकी १० टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे.
ही धावपट्टी मोठी झाल्यास पुण्यातून अमेरिका, युरोपातदेखील विमानसेवा सुरू होईल.
शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भुयारी मेट्रोचे काम पूर्ण झाले, त्यापुढचा टप्पा असणाऱ्या स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोला केंद्र सरकारकडून मान्यता. काही दिवसांत भूमिपूजन होणार आहे.
मुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ६७० कोटी रुपयांची तरतूद. निधी लवकरच मिळेल.
गेल्या १०० दिवसांत पुण्याला केंद्र सरकारकडून अनेक प्रकल्प, सेवा मिळाल्या
सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षांत शहरातील अन्य मेट्रो मार्गांचा विस्तार, पुरंदर विमानतळ, नवीन लोहमार्ग यासह अनेक गोष्टी मिळतील. विरोधकांकडून ‘पुण्याचे शिल्पकार’ असे टोमणे मारले जात असले तरी पुण्याचा विकास आम्हीच करू शकतो, हे सिद्ध झाले आहे.
-मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय सहकार, नागरी उड्डाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.