बारामती, ता. 9- गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेल उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (ता. 9) बारामतीत बोलले. त्यांच्या भाषणात त्यांनी नाव न घेता शरद पवार व सुप्रिया सुळेंवर आरोप तर केलेच पण बारामतीकरांनीही विकासाच्या मागे जायच की भावनिक व्हायचं याचा निर्णय घ्यायचा आहे अशी सादही घातली.
पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्यासोबत मी अनेक वर्ष विधानसभेत काम केले आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा मी गाडीत बसून प्रचार करणार असल्याचे त्यांनी मला आवर्जून सांगितले. ते म्हणाले की मी 69 वर्षाचा असताना तुमच्या काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीत बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायची पध्दत असते अशा आशयाचा प्रचार केला होता, त्या निवडणुकीत दादा जाधवराव पराभूत झाले होते. ते शल्य आजही त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे ते सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे अजित पवार यांनी भाषणात नमूद केले.
विजय शिवतारे मला भेटायला आले होते, त्यावेळेस त्यांनी मला त्यांना कोणा कोणाचे फोन आले होते हे दाखविले. माझ्यासोबतच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी त्यांना रात्री साडेबारा वाजता कोणाकोणाचे फोन आले हे दाखवले. हे फोन कोणाचे आहेत हे पाहिल्यानंतर मला अतिशय वाईट वाटले. राजकारण कोणत्या पातळीवर आलेले आहे, याची मला जाणीव झाली. ज्यांच्यासाठी मी जीवाचं रान केले त्यांनीच अशा पद्धतीने माझ्या विरुद्ध गोष्टी करणे हे दुःखदायक होतं. हृदयात कुठेतरी दुखतं म्हणून हे सगळं बोलावं लागतं असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
माझ्या निवडणुकीत माझी भावंड कधीच फिरली नाहीत इतकी गरागरा या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, निवडणूक संपल्यानंतर यापैकी एकही तिकडे फिरणार सुद्धा नाहीत. निवडणूक झाल्यानंतर अजित पवार व त्याचे कार्यकर्तेच या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत हे कोणीही विसरू नका. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा या छत्र्या आहेत. काही दिवसांनी परदेशात हवाई सफर करायला ते निघून जातील. मी गप्प बसतोय याचा अर्थ तुम्ही फार वळवळ करू नका, मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला फिरता येणार नाही, हे विसरू नका असा इशाराच अजित पवार यांनी या भाषणात दिला.
गेल्या कित्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचाराला यावं लागायचं नाही. शेवटची सभा तुम्ही घ्यायचा, मतदान करून निघून जात होता. आता अस काय झाल की तुम्हाला मतदारसंघात इतके फिरावे लागते, असा सवाल अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच नाव न घेता केला.
नमो रोजगार मेळाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेकदा टीका केली होती, तो धागा पकडून अजित पवार म्हणाले की आम्ही दहा हजार लोकांना तरी नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्ही 1000 लोकांना तरी आजपर्यंत नोक-या दिल्या का असा सवाल त्यांनी केला. बारामतीत आमच्या माध्यमातून झालेली अनेक कामे विद्यमान खासदारांच्या विकासाच्या पुस्तिकेत बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटले असे अजित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.