पुणे - पंतप्रधान लेहमध्ये जखमी सैनिकांना भेटण्यासाठी गेले होते, त्यावरूनही विरोधकांनी टीका सुरू केली आहे. मात्र या कृतीचे पवारांनी स्वागत केले आहे. पुण्यात पत्रकारांशी पवार बोलत होते. ते म्हणाले, " 1962 च्या चीन युद्धात पराभव झाल्यावरही पंडीत नेहरू पंतप्रधान म्हणून तेथे गेले होते. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना सैनिकांना भेटण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी जवानांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सैन्याचे मनोधर्य वाढवण्यासंबंधीची काळजी देशाच्या नेतृत्त्वाने घ्यायची असते. ती मोदी घेत आहेत, त्यामुळे त्यात मला काही विशेष वाटत नाही.''
चीनचा प्रश्न "डिप्लोमॅटिक' पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. जागतिक दबाव आणून त्यात जर यशस्वी झालो तर ते अधिक उपयुक्त होईल, असे मला वाटते. आता चीनने सैन्य मागे घेतल्याचे समजते आहे ते योग्य आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. गलवान खोऱ्यात रस्ता बांधण्याच्या विषयावरून चीनचा काही समज-गैरसमज असू शकतो. तेथे रस्ता बांधण्याचे काम भारताचेच आहे. तो रस्ता शंभर टक्के भारताच्या हद्दीतच आहे, असेही ते म्हणाले.
चीनच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी मी भूमिका मांडली. 1993 मध्ये संरक्षणमंत्री असताना आम्ही चीनशी सीमेवर शस्त्र वापरासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे तेथे शस्त्र वापरले जाणार नाहीत. हत्यार वापरणे आपल्याला शक्य आहे; परंतु हा दोन्ही देशांच्या हिताचा नाही, असे त्यावेळी मी सांगितले होते.
भारत चीन सीमेवर वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाख दौऱा करून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथं जवानांना मार्गदर्शन करत त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला होता. तसंच जागतिक स्तरावर असाही एक संदेश दिला की भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही.
शरद पवार यांनी याआधीही चीनच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं होतं की, चीनसोबत सुरु असलेला हा सीमा वाद गंभीर आहे. यामध्ये घाईगडबडीत कोणती प्रतिक्रिया देता येणार नाही. शरद पवार म्हणाले होते की, 1962 मध्ये काय झालं होतं हे कधीच विसरू शकत नाही. चीनने आपल्या 45 हजार वर्ग किलोमीटर जमीनीवर ताबा मिळवला होता. ही जमीन अजुनही चीनकडेच आहे. आता चीनने जमीनीवर ताबा मिळवला की नाही हे माहिती नाही मात्र यावर बोलताना इतिहाससुद्दा लक्षात असला पाहिजे. देशाच्या सुरक्षेवरून राजकारण करू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.