अजित पवार म्हणतात, एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या!

Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

बारामती : नगरसेवकांच्या पार्टीमिटींगमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने उद्विग्न झालेल्या अजित पवार यांनी अखेर सर्वांनीच राजीनामे द्या, सरळ प्रशासक बसवून त्यांच्याकडूनच मी सगळी कामे करुन घेतो या शब्दात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. सत्ता आल्यानंतर शहराचा विकास करायचा की नगरसेवकातील वाद मिटवत बसायचे असा सवाल करत सर्वांनी एकदिलाने काम करा असा कानमंत्रही पवार यांनी दिला. 

आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नगरसेवकांची पार्टी मिटींग झाली. यात काही नगरसेवकांनी परस्परांबाबत काही तक्रारी केल्या. तक्रारींचा सूर अधिक गंभीर होत गेल्यानंतर अनेकदा अजित पवारांनीच त्यात हस्तक्षेप केला. एका क्षणी तर नळावरची भांडणे सुरु आहेत की काय अशी संतप्त टीपण्णीही अजित पवारांनी केल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक विषयांवर नगरसेवकात कलगीतुरा झाल्यानंतर संतप्त अजित पवारांनी सर्वांनी एकदिलाने काम करा नाहीतर सगळ्यांनीच राजीनामे देऊन घरी जा, मी नगरपालिकेवर प्रशासक आणून त्यांच्याकडून विकासकामे करुन घेतो अशी तंबी दिली. 

लोकांनी इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी केल्यानंतर आता रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी वेगाने कामे करण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, मात्र नगरसेवकातील वाद मिटविण्यातच त्यांचा वेळ खर्ची पडला असे आजचे चित्र होते. नगराध्यक्षही या बैठकीनंतर उद्विग्न होऊन बाहेर पडल्याचे सांगितले गेले, मात्र नगराध्यक्षांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची या वरची प्रतिक्रीया समजली नाही. नगरसेवकांमधील गटबाजी आज पार्टी मिटींगच्या निमित्ताने अजित पवारांपुढेही आली आणि तेही याला वैतागले होते. पवार यांनी कानपिचक्या दिल्यानंतर तरी आता सगळे नगरसेवक एकदिलाने काम करणार का याचीच आज चर्चा सुरु होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.