कानगाव : राज्य सरकारने पाण्याचे नियोजन नीट केले नसल्यामुळे पुरंदरसह दौंड, इंदापूर तालुक्यातील काही गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सध्याचे राज्य सरकार कधीही महागाई, बेरोजगारी अथवा भ्रष्टाचारावर बोलत नाही. फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका करणे एवढेच या सरकारचे काम आहे, अशी घणाघाती टीका यावेळी सुळे यांनी केली.
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा प्रारंभ केला. जेष्ठ नागरिकांची आवर्जून भेट घेत जातीने त्यांच्या तब्येतीची आणि अन्य अडचणींची विचापुस केली.
यात काही वारकऱ्यांचाही समावेश होता. कुसेगावच्या सरपंच सुप्रिया भोसले यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, विठ्ठल खराडे, रामभाऊ टूले, प्रशांत शितोळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी केवळ बारामती लोकसभा मतदार संघाच्याच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात दौंड तालुक्याचे योगदान खूप मोठे असल्याचे सांगितले. कुरकुंभ येथे वॅक्सिन बनवण्याची कंपनी झाल्यामुळे अख्या देशालाच नव्हे तर जगाला या तालुक्याने वॅक्सिन पुरवले असल्याचा गौरव त्यांनी केला.
आपल्यावर कितीही टीका झाली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण नेहमी लढत राहू. त्यासाठी आपले निलंबन झाले तरी चालेल; पण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेत आपण सातत्याने आवाज उठवत राहणार.
त्यांच्या भल्यासाठी, जीवनमान सुधारण्यासाठी हिताच्या दृष्टीने नवनवीन पॉलिसी आणण्यासाठीच आपण राजकारणात आलो आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
दौंड तालुक्यातीळ वीज, रस्ते, शाळा, धरणे, एमआयडीसी कुणाच्या काळात झाले, हे सगळी जनता जाणते. सगळ्या सुविधा काँग्रेसच्या काळात झाल्या. देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून पास झाले असून आत्ताचे जे राज्य सरकार आहे ते कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे.
या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला फक्त फसवले असून आरक्षणाचे सतत गाजर दाखवत आहे, असा आरोप सुळे यांनी यावेळी केला. कुसेगाव येथे ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आणि लोकांचे प्रश्न त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी कुठल्याही व्यासपीठावर किंवा खुर्चीवर न बसता जमिनीवर बसत सुळे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांना अद्याप केंद्र सरकारकडून ईपीएस चे पैसे मिळाले नाहीत. त्याबाबत गेली दहा वर्षे आपण संसदेत प्रश्न विचारत आहोत.
ज्येष्ठांचा तो पैसा कुठे गेला हा आपला प्रश्न असून याबाबत सरकारला यापुढेही कायम आपण विचारत राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुधाला आणि कांद्याला भाव दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
कुसेगाव येथे सुळे यांच्या भोवती पडलेला नागरिकांचा गराडा पाहता तेथील वातावरण उत्साह बघून सुप्रिया सुळे यांनी, 'असे वातावरण असेल तर आपण देशात पहिल्या क्रमांकाने निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.