पुणे - गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महापालिकेकडे दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली. वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिकांना प्रस्ताव दाखल करता आले नाहीत. आणखी मुदतवाढ दिल्यास आणि क्षेत्रीय कार्यालयांनी अधिकाधिक जागृती केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागांत सर्वसामान्य नागरिकांनी काही वर्षांपूर्वी अर्ध्या गुंठ्यापासून ते एक-दोन गुंठ्यांपर्यंत जागा विकत घेऊन घरे बांधली. अशा गुंठेवारीतील बांधकामांची संख्या मोठी आहे. महापालिकेच्या हद्दीतील २०२० पूर्वीचे गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करावे, असे महापालिका प्रशासनाने आदेश दिले होते.
त्यानंतर नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यास महापालिकेने मुदतवाढ दिली. दुसऱ्यावेळी दिलेली मुदतवाढ ३१ जुलैला संपली. त्यानंतरही प्रस्ताव कमी दाखल झाले. गुंठेवारीतील बांधकामांची संख्या लक्षणीय असताना दाखल प्रस्तावांची संख्या जास्त असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात प्रस्तावांची संख्या कमीच आहे.
शुल्क ठरतेय अडचणीचे...
बांधकाम नियमित करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाही. यासह इतर वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक प्रस्ताव दाखल करण्याबाबत उत्सुक नसल्याची सद्यःस्थिती आहे. ३१ जुलैपर्यंत बांधकाम विभागाकडे ८५० प्रस्ताव आले आहेत.
‘गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्यासाठी नागरिकांनी मुदतीत प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र दाखल प्रस्तावांची संख्या कमी आहे. नागरिक शुल्कामुळे प्रस्ताव दाखल करण्यास उत्सुक नसल्याची दाट शक्यता आहे,’ असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुदतवाढीची मागणी
प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. सुतार म्हणाले, ‘नागरिकांनी छोट्या जागा घेऊन घरे बांधली आहेत. गुंठेवारीनुसार झालेल्या बांधकामांची संख्या लक्षणीय आहे.
नागरिकांनी प्रस्ताव सादर न करण्यास वेगवेगळी कारणे आहेत. अजूनही अनेकांना त्यांची बांधकामे नियमित करायची आहेत. त्यासाठी मुदतवाढ द्यावी. त्यातून महापालिकेलाच मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल.’
प्रस्ताव नामंजूर होण्याची कारणे
‘एफएसआय’च्या नियमानुसार बांधकाम नसणे
आवश्यक कागदपत्रांची कमतरता
जागेची मोजणी नसणे
ना-हरकत प्रमाणपत्र सादर न करणे
प्रस्तावाच्या पडताळणीमध्ये निघणाऱ्या तांत्रिक त्रुटी
गुंठेवारी प्रस्तावांची सद्यःस्थिती
एकूण प्रस्ताव - ८५६
नाकारलेले प्रस्ताव - ५४७
मंजूर प्रस्ताव - २०
प्रक्रियेत असलेले प्रस्ताव - २८९
जनजागृती गरजेची
क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर जागृती करणे
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनीही नागरिकांशी संवाद वाढविणे
नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेत मार्ग काढणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.