Neo Metro : द्रुतगती उन्नत मार्गासह निओ मेट्रो अधांतरी; प्रकल्प कागदावरच

पुणे महापालिकेच्या १९८७ विकास आराखड्यात वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत मार्गाचे (एचसीएमटीआर) आरक्षण टाकलेले आहे.
Neo Metro
Neo Metrosakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या १९८७ विकास आराखड्यात वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत मार्गाचे (एचसीएमटीआर) आरक्षण टाकलेले आहे. मात्र गेल्या २६ वर्षांत हा मार्ग कागदावरच आहे. सार्वजनिक व खासगी वाहतुकीसाठी या मार्गाचा प्रस्ताव आणला, मात्र तो खर्चिक ठरला म्हणून रद्द केला.

त्यानंतर निओ मेट्रो प्रस्तावित केली, पण त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल साशंकता असल्याने गेल्या दीड वर्षापासून महापालिकेकडे याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) पडून आहे. २०२३ या वर्षात काहीच झाले नाही आणि २०२४ मध्येही ‘एचसीएमटीआर’वर निर्णय होईल अशी स्थिती नाही. या आरक्षणावर काहीच केले जात नसल्याने त्याचा फटका सामान्य पुणेकरांना बसत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, यासाठी १९८७ च्या विकास आराखड्यात ‘एचसीएमटीआर’चे आरक्षण टाकण्यात आले होते. २० वर्षांत त्यावर काहीच प्रगती झालेली नाही. पुण्यातील अवजड वाहतूक शहराच्या बाहेर काढणे, शहराभोवती सार्वजनिक वाहतूक मार्ग तयार करणे यावर चर्चा सुरू झाल्यानंतर २०१७ पासून ‘एचसीमटीआर’या प्रकल्पास तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

असा आहे एचसीएमटीआर मार्ग

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  • बोपोडी

  • पौड रस्ता

  • सातारा रस्ता

  • कोंढवा रस्ता

  • सोलापूर रस्ता

  • नगर रस्ता

  • विश्रांतवाडी

म्हणून निविदा झाल्या रद्द

‘एचसीमटीआर’ मार्ग हा ३५.९६ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रुंद आहे. यात उन्नत मार्ग तयार करताना खासगी वाहनांसह ‘बीआरटी’साठी स्वतंत्र लेन असा सहापदरी रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाची केवळ ४० टक्केच जागा ताब्यात आल्याने भूसंपादनाची कामे वेगात व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला होता.

महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीने ५२०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरलेला असताना निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी १२ हजार कोटींचा खर्च निविदेत दाखवला. ४५ टक्के जादा दराने निविदा आल्याने ७ हजार कोटीने खर्च वाढला. त्यामुळे जानेवारी २०२० मध्ये या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली.

निओ मेट्रोचा डीपीआर तयार करण्याचा आदेश

‘एचसीएमटीआर’वर सहापदरी रस्त्याची निविदा रद्द झाल्यानंतर तेथे निओ मेट्रोचा विचार करावा, अशी सूचना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानंतर ‘दस मे बस’या ‘पीएमपी’च्या बससेवेच्या उद्‍घाटन कार्यक्रमात तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ‘एचसीएमटीआर’वर निओ मेट्रो केली पाहिजे, त्यासाठी महामेट्रो डीपीआर तयार करेल, असे सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोने २०२२ मध्ये महापालिकेला निओ मेट्रोचा डीपीआर सादर केला आहे.

तंत्रज्ञानाबद्दल साशंकता

निओ मेट्रो म्हणजे रबरी चाकांवर व विजेवर धावणारी मेट्रो. बसच्या तुलनेत चार ते पाचपट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून, ताशी ९० किलोमीटर इतक्या वेगाने ती धावू शकते. त्यासाठी ४ हजार ९४० कोटी रुपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे. पण अशा प्रकारची निओ मेट्रो देशात कोणत्याही शहरात धावत नाही. नाशिक येथील निओ मेट्रोच्या प्रस्तावाला अद्याप केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही.

हाच मुद्दा समोर आल्यानंतर अजित पवार यांनी त्यांची भूमिका बदलत इतर शहरात निओ मेट्रो झाल्याशिवाय पुण्यातही प्रकल्प नको, असे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीतदेखील चर्चा झाली. त्यामुळे सध्या तरी हा प्रकल्प न करण्याचा निर्णय झाला आहे.

महापालिकेच्या अनेक हरकती

महामेट्रोने महापालिकेला निओ मेट्रोचा डीपीआर सादर केल्यानंतर महापालिका व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊनही पाहणी केली आहे. यात मेट्रो आणि वर्तुळाकार निओ मेट्रो एकमेकांना आठ ते नऊ ठिकाणी एकमेकांना क्रॉस जाणार आहेत.

गणेशखिंड रस्त्यावर पीएमआरडीए मेट्रोच्या पुलावरून पुणे विद्यापीठातून येणारी निओ मेट्रो सेनापती बापट रस्त्यावर किमान ३० मीटर इतक्या उंचीवरून जाणार आहे. कर्वे रस्त्यावरून म्हात्रे पूल डीपी रस्त्यापर्यंत निओ मेट्रो नाल्यातून दाखवली आहे.

म्हात्रे पूल, सेनादत्त पोलिस चौकी, साने गुरुजी वसाहत, स्वारगेट, गंगाधाम, वानवडी, वडगाव शेरी आदी भागातून अतिशय अरुंद रस्त्यावरून निओ मेट्रोचे खांब दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने यावर हरकत घेतली आहे.

निओ मेट्रो

  • ४५ - स्थानकांची संख्या

  • ४३.८४ - किलोमीटर लांबी

  • ४९४० - कोटी अंदाजे खर्च

एचसीएमटीआर उन्नत मार्ग

  • ३५.९६ - किलोमीटर लांबी

  • २४ - मीटर रुंदी

  • ३६ - बीआरटीचे थांबे

  • २ - बीआरटी लेन

  • ४ - खासगी वाहनांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.