पुणे : सध्या जगभरातील खगोलप्रेमींच्या आकर्षनाचे केंद्र असलेला निओवाईज धूमकेतू मंगळवारपासून (ता. 14) आकाशात दिसणार आहे. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर हा धूमकेतू दिसेल. विशेष म्हणजे आकाश निरभ्र असल्यास याचे छायाचित्रही तुम्हाला घेता येईल. सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतूचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
संशोधन या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनूसार, निओवाईज धूमकेतूची कक्षा सुमारे 6800 वर्षांची आहे. याचा अर्थ या आधी हा धूमकेतू जेव्हा सूर्याजवळ आला होता, तेव्हा पृथ्वीवर मानवी संस्कृती प्राथमिक अवस्थेत होती. सूर्याजवळ येत असताना निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर (निओवाईज) या नासाच्या स्पेस टेलिस्कोपच्या साह्याने 27 मार्च 2020 ला नव्या धूमकेतूचा शोध लागला. या टेलिस्कोपच्या नावावरूनच धूमकेतूला निओवाईज म्हणून संबोधले जात आहे. नोंदींनुसार धूमकेतूचा शोध क्रमांक सी / 2020 एफ 3 असा आहे. आधुनिक साधनांनुसार केलेल्या मापनानुसार धूमकेतूचा केंद्रभाग फक्त पाच किलोमीटरचा असून, त्याची शेपूट अवकाशात लाखो किलोमीटर दूरपर्यंत पसरली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निओवाईज धूमकेतू 3 जुलैला सूर्यापासून सर्वात कमी म्हणजे चार कोटी 30 लाख किलोमीटर अंतरावर होता. येत्या 23 जुलै रोजी निओवाईज पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावरून, म्हणजे 10 कोटी 30 लाख किलोमीटरवरून प्रवास करेल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात निओवाईजचे आकाशात सूर्यापासून अंतर जसजसे वाढत गेले, तसा हा धूमकेतू लहान दुर्बिणींच्या आवाक्यात आला. उत्तर गोलार्धात ज्या भागांमध्ये आकाश निरभ्र आणि काळोखे आहे, त्या भागांतून त्याचे साध्या डोळ्यांनीही दर्शन घडले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा धूमकेतू एक ते दोन मॅग्निट्यूड इतका प्रकाशमान आहे. सध्या या धूमकेतूच्या आयन आणि धूळ अशा दोन शेपट्या दिसत आहेत.
सौजन्य
सुरुवातीला सूर्योदयाआधी थोडावेळ उत्तर- पूर्वेच्या क्षितिजाजवळ दिसणारा निओवाईज धूमकेतू 14 जुलैपासून सूर्यास्तानंतर उत्तर- पश्चिम क्षितिजावर दिसू लागेल. 14 ते 23 जुलै दरम्यान निओवाईज सूर्यास्तानंतर रोज क्षितिजापासून थोडा वर सरकलेला दिसून येईल. त्यामुळे अंधाऱ्या आकाशात धूमकेतूला शोधणे सोपे जाईल. मात्र, याच काळात निओवाईजची प्रकाशमानताही कमी होणार असल्यामुळे नंतर त्याला शोधण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असेल. 18 ते 29 जुलै दरम्यान निओवाईजचा सप्तर्षी तारकासमूहाजवळून प्रवास होणार आहे. डीएसएलआर कॅमेराच्या साह्याने लॉन्ग एक्स्पोजर देऊन धूमकेतूची निओवाईज छायाचित्रे घेता येऊ शकतात. 1997 मध्ये दिसलेल्या आणि मोठ्या प्रमाणात छायाचित्रे घेतल्या गेलेल्या हेलबॉप धूमकेतूइतका निओवाईज हा तेजस्वी नसला; तरी 2007 नंतर प्रथमच साध्या डोळ्यांना दिसू शकेल असा आणि छायाचित्रात दोन शेपट्या स्पष्टपणे दिसत आहेत असा हा धूमकेतू आहे. आकाश निरभ्र असल्यास आकाशातील या पाहुण्याला पाहण्याची आणि कॅमेरात कैद करण्याची संधी सोडू नका.
धूमकेतूंविषयी
सूर्यमालेतील सर्वांत जुन्या घटकांपैकी एक धूमकेतू मानले जातात. निश्चित असा आकार नसलेला धूळ आणि बर्फ यांच्या मिश्रणाचा प्रचंड गोळा, असे धूमकेतूचे सर्वसाधारण वर्णन करता येईल. त्यांचे आकारमान अगदी काही किलोमीटरपासून काही शे किलोमीटरपर्यंत असू शकते. काही धूमकेतूंची कक्षा सूर्यमालेतील ग्रहांच्या दरम्यान असते. मात्र, बहुतेक धूमकेतू नेपच्यून पलीकडच्या भागातून कित्येक वर्षे प्रवास करून सूर्याजवळ येतात आणि सूर्याला प्रदक्षिणा मारून पुन्हा आपल्या कक्षेत दूर निघून जातात. असे दीर्घवर्तुळाकार कक्षा असणारे धूमकेतू आपल्याला आयुष्यात एकदाच दिसू शकतात.
सूर्यापासून धूमकेतूंचे अंतर जसे कमी होईल, तसे त्यांचे तापमान वाढून त्यांच्यातील वाफ आणि वायू उफाळून बाहेर येतात. या वायूंचे धूमकेतूभोवती वातावरण तयार होते. याच वातावरणावर सूर्याकडून येणाऱ्या कणांचा मारा झाल्यावर सूर्याच्या विरुद्ध दिशेला धूमकेतूच्या वातावरणाचा भाग दूरपर्यंत पसरतो आणि धूमकेतूची शेपूट दिसू लागते. या शेपटीचेही नंतर विभाजन झालेले दिसून येते. धूमकेतूमधून बाहेर पडलेल्या वायूंची आणि धुळीची अशा दोन शेपट्या तयार झालेल्या दिसतात. धूमकेतू जसा सूर्यापासून दूर जाईल, तशी तापमान कमी झाल्यामुळे त्याची शेपूट आणि वातावरण नाहीसे होते आणि दूर अंतरावर हा घटक पुन्हा बर्फ आणि धुळीच्या प्रचंड गोळ्याच्या स्वरूपात येतो. धूमकेतूच्या शेपटीतून अवकाशात मुक्त झालेले धूलिकण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा आपल्याला उल्का पाहायला मिळतात.
सौजन्य : sanshodhan.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.