पुणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
पुणे - शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच आता शहरात नव्याने बदलून आलेल्या पोलिस उपायुक्तांना शहरातील वाहतुक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करुन, त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आणखी वेगळे प्रयोग होण्याची शक्यता आहे.
शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमनापेक्षा दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत असल्यामुळे त्यावर प्रारंभी मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. विशेषतः पाऊस, गणेशोत्सव, दिवाळीच्या काळातही वाहतुक कोंडी कायम राहिली होती. त्यातच काही मंत्र्यांनाही वाहतुक कोंडीचा फटका बसला होता.
त्यानंतरही वाहतुक पोलिसांकडून उपाययोजना होत नसल्याने अखेर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत ठोस उपायोजना करण्यास सुरुवात केली होती. वाहतुक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती, पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी चौकात उतरवुन वाहतुक नियमनावर भर देण्यात आला होता. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच रस्त्यावर उतरुन वाहतुक कोंडीची पाहणी करीत महापालिकेला पत्र लिहीले होते.
दरम्यान, शहरातील सात पोलिस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांचीही बदली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली होती. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नव्याने आलेल्या पोलिस उपायुक्तांना शहरातील वाहतुक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करुन, त्याची कारणे शोधण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात याव्यात, याचा अहवालही देण्यास सांगितले आहे. आत्तापर्यंत संदिपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख व विजय मगर या पोलिस उपायुक्त नव्याने रुजु झाले आहेत. तर पोलिस उपायुक्त अमोल झेंडे पुढील आठवड्यात रुजु होण्याची शक्यता आहे.
'नव्याने रुजु झालेल्या पोलिस उपायुक्तांना वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकारी वाहतुक कोंडीची पाहणी करुन निरीक्षणे नोंदवित आहेत.'
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.