पुणे - ‘माझी आई, शिक्षक यांच्यासह अनेकांचे माझ्यावर संस्कार आहेत. ‘पिलानी’तील नानाजी, डॉ. गोंधळेकर तसेच शंतनूराव किर्लोस्कर, डॉ. अच्युतराव आपटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांसारख्या मोठ्या माणसांचा सहवास लाभला. अनेक संस्थांवर काम करण्याची संधी मला मिळाली. या संस्थांमधील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळाले.
कुटुंबीयांमुळे हा प्रवास सुखद झाला. या सर्वांना मी हा कृतज्ञता सन्मान अर्पण करतो. माझा सदरा हा सुखी माणसाचा सदरा आहे, असे मी म्हणतो. माझे पुढील आयुष्य समाजासाठीच असेल’, अशी हृद्य भावना ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली.
विविध सामाजिक संस्थांचे केवळ ‘पालकत्व’च नाही; तर ‘वत्सल जनकत्व’ निभावणारे समाजहितैषी उद्योजक प्रतापराव पवार यांना या सर्व संस्थांच्या वतीने रविवारी ‘कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पवार यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थी सहाय्यक समिती, सकाळ रिलीफ फंड, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन, मराठवाडा मित्रमंडळ, ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती’, स्व-रूपवर्धिनी, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन, बाएफ, बालग्राम, बालकल्याण, वनस्थळी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सकाळ माध्यम समूह, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, गर्जे मराठी ग्लोबल, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’, पुणे अंधशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग आदी संस्थांतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सन्मान सोहळ्याप्रसंगी या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित साऱ्यांनीच उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात पवार यांच्या आजवरच्या कार्याला सलाम केला.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘पवार यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अतिशय समृद्ध व संपन्न आहे. त्यांच्याकडे सखोल तांत्रिक ज्ञान आहे; आधुनिक व्यवस्थापन कौशल्य आहे. समाजातील वंचित घटकांविषयी संवेदना, स्वच्छ विचार आणि त्याला कृतिशीलतेची जोड देत पवार यांनी विविधांगी कार्य केले. त्यांनी आपल्या अनुभवाचे दान अनेक संस्थांना दिले, ते फार मोठे आहे.
गेल्या ४७ वर्षांपासून मी याचा साक्षीदार आहे.’ योगेश देशपांडे यांनी पवार यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.