बारामती: यंदा दिवाळीचा पाडवा बारामतीतील पवार कुटुंबियांमध्ये कसा साजरा होणार या कडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. दरवर्षी दिवाळीत पवार कुटुंबिय बारामतीत एकत्र जमतात, मात्र यंदा राजकीय विभाजनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी शनिवारी (ता. 2) लोकांशी संवाद साधणार आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त अजित पवार शुक्रवारी (ता. 1) बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यानिमित्त झारगडवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आपण काटेवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे नमूद केले. सहयोग येथील जागा कमी पडत असल्याने काटेवाडीत भेटण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.