बाललैंगिक अत्याचाराच्या खटल्यात न्यायालयाने एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
बारामती - बाललैंगिक अत्याचाराच्या (Child Sexual Abuse) खटल्यात न्यायालयाने एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment) सुनावली. एका पाच वर्षांच्या मुलीला घरात पिक्चर दाखविण्याच्या आमिषाने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या अजिनाथ सावळाराम शिंदे (वय 70, रा. चिमणशामळा, बारामती) यास येथील विशेष न्यायाधिश ए. ए. शहापुरे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. या सहा हजारांपैकी पाच हजार रुपये पीडीत मुलीच्या आईस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सन 2018 मध्ये सदर आरोपी पिडीतेवर अत्याचार करण्याच्या तयारीत असताना आजूबाजूच्या मुलांनी पाहिल्यावर तिच्या आईला याची माहिती दिली, त्यानंतर तात्काळ तेथे जात मुलीची सुटका करत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शिंदे याच्या विरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी या घटनेचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिंदे याला शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केस ऑफिसर म्हणून काम पाहिले. शहर पोलिस ठाण्याचे न्यायालयातील कर्मचारी व्ही. एल. लोकरे, सहायक उपनिरीक्षक नलवडे यांचे या कामी सरकार पक्षाला सहाय्य झाले.
जलदगतीने न्याय
बारामतीत बाललैंगिक अत्याचाराच्या खटल्यांसाठी नुकतीच विशेष न्यायालयाची स्थापना झाली आहे. या मुळे अशा प्रकारचे खटले वेगाने चालतात व निकालही त्वरित लागत असल्याने पक्षकारही या बाबत समाधानी आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.