पुणे - महापालिकेने गेल्यावर्षी फटाका स्टॉलच्या जागा भाड्याने देण्यासाठी ऑनलाइन लिलाव केला होता. यावर्षी पुन्हा ऑफलाइन लिलाव व्हावेत यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात आला. पण हा दबाव झुगारून प्रशासनाने ९ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १३ ठिकाणी १९४ स्टॉलसाठी निविदा काढण्याचे निश्चित केले आहे. यातून १६ लाख ५४ हजार ३६ उत्पन्न अपेक्षीत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने फटाके विक्रीसाठी पुणे महापालिकेतर्फे व्यावसायिकांना वर्तक बागेच्या शेजारी नदी काठच्या रस्त्यावर स्टॉल लावले लावण्यासाठी भाड्याने जागा दिली जाते. या ठिकाणी ऑफलाइन लिलाव करत ना स्थानिक पुढारी दादागिरी करून बोली लावू देत नाहीत. व्यावसायिकाने हिंमत करून बोली लावल्यास त्याला नंतर धमक्या दिल्या जातात. यावरून महापालिकेत गोंधळ देखील झाला आहे.
हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने २०२३ पासून ऑनलाइन लिलाव पद्धत सुरु केली. यामध्ये महापालिकेला तब्बल ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. विशेष म्हणजे ज्या स्टॉलसाठी महापालिकेने २५ हजार रुपये भाडे निश्चीत केले होते, त्यास २ लाख रुपये भाडे मिळाले आहे. ही ऑनलाइन बोली राजकीय अभय असलेल्या व्यापाऱ्यांना खूप महागात पडल्या. त्यामुळे यंदा ऑनलाइन बोली बंद करावी यासाठी दबाव आणला होता. पण प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
वर्तक बागेत यंदा ३५ दुकानांसाठी जागा भाड्याने दिली जाणार आहे. प्रत्येकी दुकानासाठी २५ हजार १५५ रुपये इतके भाडे निश्चित केले आहे. या रकमेपासून पुढे बोली लावली जाणार आहे. त्याच प्रमाणे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ९, हडपसर मुंढवा ३०, येरवडा कळस धानोरी ५, कोथरूड बावधन ५, धनकवडी सहकारनगर ३०, सिंहगड रस्ता ५, नगर रस्ता वडगाव शेरी ४०, औंध बाणेर १०, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २० दुकान भाड्याने दिले आहेत. हडपसर मुंढवा आणि धनकवडी, सहकारनगर या क्षेत्रीय कार्यालयात दोन ठिकाणी जागा भाड्याने दिल्या जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.