लोहगाव : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींच्या कोविड लसीकरणाची केवळ चारच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना लसीकरणासाठी नेण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेने १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलामुलींच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात केली.
यासाठी कॉर्बेव्हॅक्स ही लस वापरण्यात येत आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात कल्यानीनगरमधील दामोदररावजी गलांडे पाटील दवाखाना, वडगावशेरीतील मीनाताई ठाकरे दवाखाना, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय व कळसमधील (विश्रांतवाडी) गेनबा तुकाराम म्हस्के दवाखाना या महापालिकेच्या चार दवाखान्यांमध्येच १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोविड लस दिली जाते.
याबाबत बोलताना धानोरीतील नागरिक दिलीप डाळिमकर म्हणाले, १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणांच्या केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरण केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने पालकांबरोबरच मुलांचीही ससेहोलपट होताना दिसते.याविषयी पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार म्हणाल्या, लसीकरण केंद्रापासून लांब राहणाऱ्या पालकांची अडचण होते असे म्हणता येणार नाही, कारण या चारही केंद्रांच्या जवळच्या परिसरात राहणाऱ्या १२ ते १४ वयोगटातील मुलांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घेण्याचे प्रमाण कमी आहे.
कॉर्बेव्हॅक्स या लसीच्या एका बाटलीत (व्हायल) २० डोस देता येतात. पण एकदा ही बाटली वापरात आणली अन केवळ जरी दोन-चार डोस देण्यात आले, तरी उर्वरित डोससह चार तासात ही बाटली निकामी (डिस्पोज) करावी लागते. अगदी अशिक्षित पालकांमध्येही कोविडबाबत जागरूकता आहे. मुलांना कोविड संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याने अथवा इतर कारणाने पालक आपल्या मुलांना लस घेण्यासाठी येत नसावेत, याबाबत नेमके कारण देता येणार नाही, असे डॉ. लोहार म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.