वडगाव शेरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याच्या तसंच ठराविक काळ सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात अत्यावश्यक सेवा कोणत्या? तसंच कोणत्या वेळेत सुरु ठेवायच्या याबाबत राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळा आहेत. दरम्यान, चष्म्याच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा अशी मागणी ऑप्टिकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असून चष्म्याच्या दुकानांना कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जेष्ठ नागरिक आणि इतर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकडे चष्मा नसल्यामुळे हाल होत आहेत.
ऑप्टिकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेचे सचिव देवानंद लाहोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे लेखी निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे चष्म्याच्या संबंध नजरेशी असून चष्मा नसल्यामुळे डोके दुखणे, चक्कर येणे, कमी दिसणे तसेच अत्यावश्यक कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चष्म्याच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेने लॉकडाऊन बाबत काढलेल्या आदेशात चष्म्याच्या दुकाना बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही दुकाने त्यामुळे बंद ठेवण्याचा आग्रह पोलीस आणि पुणे महानगरपालिकेचे प्रशासन करीत आहे. आज विमान नगर आणि वडगाव शेरी येथील सर्व चष्म्याची दुकाने पोलिसांनी बंद करण्यास भाग पाडले. चष्म्याच्या दुकानात नेत्रतज्ञ बसतात. हे नेत्र तज्ञ डॉक्टर नाहीत. त्यामुळे चष्म्याची दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे नाईलाजास्तव ही दुकाने बंद करण्यात आली.
अगोदर ऑर्डर केलेला चष्मा घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला या दुकानांच्या बाहेर चकरा मारत होते. परंतु दुकान बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. विमान नगर येथील एका चष्म्याच्या दुकानाबाहेर थांबलेले सुदाम गायखे म्हणाले, काल माझा चष्मा तुटला. तो कसाबसा दोर्याने बांधून मी नवा चष्मा बनवण्यासाठी आज येथे आलो होतो. परंतु सर्व दुकान बंद आहेत.
आईचा चष्मा घेण्यासाठी आलेला विकास माने म्हणाला, आईचा चष्मा आज मिळणार होता याकरता तो घेण्यासाठी मी येथे आलो होतो परंतु दुकान बंद आहे आईला चष्मा नसेल तर काही काम करता येत नाही. चष्म्याच्या दुकानाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा.
विमाननगर येथील लेन्स कार्ट या दुकानाचे व्यवस्थापक इक्बाल शेख म्हणाले, सकाळी आम्ही दुकान सुरू करणार होतो. परंतु पोलिसांनी दुकान बंद करायला सांगितले. दुकानात डॉक्टर नाहीत. नेत्रतज्ञ आहेत. त्यामुळे दुकान उघडू नका, असे आदेश पोलिसांनी दिले. त्यामुळे दुकान बंद ठेवले आहे.
संघटनेचे सचिव देवानंद लाहोरे म्हणाले, चष्म्याच्या दुकानांकडून आरोग्य सेवेतील घटक म्हणून केंद्रशासन जीएसटी घेते. जीएसटी च्या कलम 19 प्रमाणे चष्म्याचे दुकाने ही आरोग्यविषयक सेवा देणारे घटक म्हणून गणली जातात. परंतु लोक डाऊन मध्ये मात्र आम्हाला अत्यावश्यक सेवेत गणले जात नाही. हा विरोधाभास असून शासनाच्या दुकानांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.