किरकटवाडी - पुणे शहराच्या हद्दीलगतची 23 गावे पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाकडून काल संध्याकाळी जारी करण्यात आला आणि अनेक वर्षांपासूनची या गावांतील नागरिकांची पालिकेत जाण्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी या गावांतील नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.
खडकवासला ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी अशा विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही खडकवासला गाव महानगरपालिका हद्दीत समाविष्ट केल्या बाबत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच पक्षीय मतभेद विसरून एकमेकांना पेढे भरुन आनंद साजरा करण्यात आला. किरकटवाडी, नांदेड व नांदोशी येथेही गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र जमत आपले गाव महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्याबाबत समाधान व्यक्त केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नोंदींसाठी नागरीकांची धावपळ
गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट होणार अशी चर्चा सुरू झाल्यापासूनच बांधकामांच्या नोंदणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांची धावपळ सुरू झालेली होती. 'कर' वाचविण्यासाठी मुद्दाम नोंद न केलेल्या बांधकामांची नोंद लावून घेण्यासाठी आता मात्र नागरिक 'सर्वतोपरी' प्रयत्न करताना दिसत आहेत. काल अध्यादेश आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीशी संबंधित कामे पूर्ण करून घेण्यासाठी आज सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये गर्दी केलेली दिसत होती.
समाज माध्यमांवर चर्चेचा एकमेव विषय
व्हॉट्सऍप ग्रुप, फेसबूक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अशा समाज माध्यमांवर 23 गावे पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्याबाबतचा अध्यादेश फिरत होता. सर्व समाज माध्यमांवर हा एकमेव चर्चेचा विषय बनला होता. परिसरातील नागरिक एकमेकांना गावे महानगरपालिका हद्दीत गेल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत होते. काही कार्यकर्त्यांनी तर आपल्या पसंतीच्या नेत्यांचे फोटो 'भावी नगरसेवक' म्हणून व्हाट्सॲप स्टेट्स, फेसबुक स्टोरी यांवर अपलोड केल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले होते.
इच्छुकांची फिल्डिंग लावण्यास सुरुवात
गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश आल्यानंतर 'नगरसेवक' होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.जवळच्या कार्यकर्त्यांना फोन करून 'सहकार्य' करण्याचे आवाहन इच्छुकांकडून केले जात आहे.आपापल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करुण 'आशिर्वाद' मिळविण्यासाठीची मोर्चेबांधणी इच्छुकांनी सुरू केली आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.