Organs Donate : पुण्यात नऊ वर्षांच्या मुलाचे अवयव दान; पाच जणांना मिळाले जीवनदान

अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने जगाचा निरोप घेताना केलेल्या अवयवदानामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले.
organs donate
organs donateSakal
Updated on

पुणे - अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने जगाचा निरोप घेताना केलेल्या अवयवदानामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले. पुण्यात या वर्षात आतापर्यंत झालेले हे ३६वे अवयव दान असल्याची माहिती ‘झोनल ट्रॅन्सप्लँट को-ऑर्डिनेशन कमिटी’तर्फे (झेडटीसीसी) देण्यात आली.

जेमतेम नऊ वर्षांच्या मुलाचे डोके दुखत होते. त्याला चक्कर येत होती. त्यामुळे त्याला कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स अँड बुधराणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करत असतानाच त्याला चक्कर आली. त्यामुळे त्याला तातडीने अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.

तेथे केलेल्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून आणि तपासण्यांमधून त्याच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ कर्करोगाची नव्हती, असेही त्या चाचण्यांमधून स्पष्ट झाले. या निदानानंतर त्याच्यावर उपचार सुरू केले. पण, त्याच्या शरीराने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचे मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेन डेड) डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आईचे गेल्या वर्षीच न्यूमोनियामुळे निधन झाले होते.

अवघ्या एक वर्षात त्यांचा नऊ वर्षाचा मुलगाही मृत्यूच्या दारात उभा होता. या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक सेवा विभागातील कर्मचाऱ्यांनी मुलाच्या अवयवदानाचे आवाहन केले. त्याला मुलाच्या वडिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुलाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड, स्वादूपींड आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अवयव प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या रुग्णांना देण्यात आले.

रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदानाला परवानगी दिल्यानंतर एक मूत्रपिंड ज्युपिटर रुग्णालयाला, तर दुसरे सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. स्वादूपींड सह्याद्री रुग्णालय, तर डी. वाय. पाटील रुग्णालयातील रुग्णावर फुफ्फुस प्रत्यारोपण केले. यकृत रुबी हॉल क्लिनिकमधील रुग्णाला प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती ‘झेडटीसीसी’तर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.