पुणे : बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कमतरतेपलीकडे जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठाही थांबण्याची वेळी आली आहे. पुरवठा न झाल्याने शहरातील आठ खासगी रुग्णालयांत जेमतेम चार-पाच तास पुरेल इतकेच ऑक्सिजन असल्याने अत्यवस्थ रुग्णांना कुठे हलविणार असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. गंभीर म्हणजे, ऑक्सिजन संपल्याने शहरालगतच्या एका रुग्णालयांतील १० रुग्णांना इतर ठिकाणी हलविले गेले.
मात्र, महापालिकेच्या रुणालयांतही रोजच्या मागणीच्या तुलनेत कमीच साठा असला तरी, तो रुग्णांना पुरेल असे महापालिकेने स्पष्ट केले.
पुण्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढून, त्यांना ऑक्सिजनच्या उपचाराची गरज भासत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांकडून ऑक्सिजनची तिप्पट मागणी होऊ लागली आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरवठाच होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तुटवडा जाणवत आहे. आता तर काही रुग्णालयांतील ऑक्सिजन कोणत्याही क्षणी संपण्याची भीती रुग्णालय व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. रुग्णांची स्थिती दाखवून ऑक्सिजनचा किमान पुरवठा करण्याचा आग्रह या रुग्णालयांनी महापालिकेकडे धरला आहे. मात्र, महापालिकेलाच मोजून-मापूनच ऑक्सिजन मिळत नसल्याने खासगी रुग्णालयांना मदत करण्यात अडचणी येत आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
सविस्तर माहिती मागविली ः अग्रवाल
खासगी रुग्णालयांत रुग्णांना बेड ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, दाखल केलेल्या रुग्णांना उपचार मिळालेच पाहिजे. त्याची कोणतीही गैरसोय होऊन नये, याची व्यवस्था रुग्णालयांनी आपल्या पातळीवर करायलाच हवी. त्यासाठी ज्या ठिकाणी रुग्ण आहेत, त्या रुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती घेण्यात येईल, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले. ज्या रुग्णांनी ऑक्सिजनची सुविधा सुरू करून रुग्णांना दाखल करून घेतले आणि आता त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असून, अशा रुग्णालयांतील उपचार व्यवस्थेचा सविस्तर माहिती ही मागविण्यात येत आहे.
''पुणे शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढवून मागितली आहे. मात्र, महापालिकेच्या आठ रुग्णालयांत पुरेसा ऑक्सिजन आहे. खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांसाठी रोज तीनशे टन ऑक्सिजन मिळत आहे. ही मागणी आता साडेतीनशे-पावणेचारशे टनापर्यंत जात आहे.''
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका