मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकून १० फेब्रुवारी १७७१ रोजी भगवा फडकाविला. याला यावर्षी २५० वर्षे पूर्ण होत आहेत. १४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतमध्ये परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धामध्ये जरी अब्दालीचा विजय झाला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही.
पानिपतनंतर अब्दालीचा हस्तक देशद्रोही नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करून अत्याचार, लुटालूट करीत होता. परकीय आक्रमणापासून हिंदुस्थान आणि दिल्लीचे रक्षण करणारी कोणतीही शक्तिशाली भारतीय राजसत्ता नव्हती. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी हिंदुस्थानात आपल्या सत्तेचा पाया घातला. एवढेच नव्हे, तर शाह आलम बादशहालाही पाटण्यामध्ये नजरकैदेत ठेवले होते.
नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर १७ वर्षांच्या माधवराव पेशव्यांवर मराठी राज्याची जबाबदारी आली. अशा संकटसमयी माधवरावांनी धीरोदात्तपणाने महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या साह्याने मराठी साम्राज्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. इंग्रजांच्या नजरकैदेत असलेल्या शाह आलम बादशहाने माधवराव पेशवे आणि महादजींकडे संधान बांधून आपणास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले व विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे यांच्याबरोबर पन्नास हजारांची फौज देऊन उत्तरेकडे महादजी व तुकोजींच्या मदतीस रवाना केली.
आता महादजी व तुकोजींच्या नेतृत्वाखाली मराठे अब्दालीचा अफगाण हस्तक नजीबखानाच्या ताब्यातून दिल्ली मुक्त करण्याच्या कामगिरीवर निघाले. हे वर्तमान समजताच भयभीत झालेल्या नजीबखानाने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठविला. परंतु महादजींनी तो झिडकारला.
मराठ्यांच्या भीतीने हाय खाऊन ३१ ऑक्टोबर १७७० रोजी नजीबखान मरण पावला. नजीबखानाचा मुलगा झाबेदाखान याने दिल्लीचा ताबा घेतला होता. मराठ्यांच्या फौजा दिल्लीजवळ पोहोचल्या. ७ फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी शिंद्यांनी दिल्ली शहर जिंकून घेतले व दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. झाबेदाखान व कासीम अलिखान याने काही काळ प्रतिकार केला; पण मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि मराठ्यांनी त्यांना कैद केले. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा दिल्लीवर फडकावला. हे वर्तमान समजताच इंग्रजांनी मराठ्यांशी शत्रूत्व नको म्हणून शाह आलमची सुटका करून त्याची दिल्लीकडे रवानगी केली. शाह आलम दिल्लीत येताच महादजी त्याला आपल्याबरोबर घेऊन पानिपतचा बदला घेण्यास निघाला.
मराठ्यांनी पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानाने पानिपतमध्ये लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपतचा पुरता बदला घेतला. ही बातमी ज्या वेळेस अब्दालीला समजली असेल त्या वेळेस तो किती संतापला असेल? परंतु त्याची पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही. लवकरच १४ एप्रिल १७७२ रोजी तो काबूलमध्ये मृत्यू पावला.
शाह आलम बादशहाने महादजी शिंद्यांच्या महत्कार्याबद्दल त्यांना आपल्या मुतालिकीची सनद देऊन दिल्लीचा कारभार त्यांच्यावर सोपविला. महादजींनी १७७१ पासून १७९४ सालापर्यंत म्हणजेच निधनापर्यंत दिल्लीचा कारभार करून लाल किल्ल्याचे रक्षण केले. त्याहीनंतर १८०३ मध्ये दिल्ली जिंकणाऱ्या इंग्रज सेनापती जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, “दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे, तर मराठ्यांशी लढून जिंकली.” मराठ्यांच्या या पराक्रमाला आणि प्रेरणादायी देशभक्तीला त्रिवार वंदन!
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.