पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील दिव्यांग दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाने एका हाताने शेती करत भेंडीच्या पिकापासून चांगले उत्पन्न घेत ‘शेती परवडत नाही’ म्हणणाऱ्या तरुणांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. केवळ २० गुंठे क्षेत्रात एका तोड्याला १०० ते १२० किलो भेंडी निघत आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. दयानंदला तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे.
ढोबळेमळ्यातील दयानंद ढोबळे हा आठवीत असताना कुट्टी मशिनमध्ये उजवा हात गेल्याने मनगटापासून पुढे तुटला आहे. तेव्हापासून दयानंद सर्व कामे एकाच डाव्या हाताने करत आहे. दयानंदचा मोठा भाऊ हितेश मेकॅनिकल इंजिनरिंगची पदवी संपादन करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नुकतीच त्याची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
धाकटी बहिण काजल सिव्हिल इंजिनरिंगची पदवी संपादन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. हितेश व काजल ला उच्च शिक्षण घेता यावे म्हणून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातून शिक्षण सोडून दयानंद घरची शेती करू लागला. धडधाकट तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने दयानंद आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत एका हाताने शेती करत शेतात विविध पिके घेत आहे.
दयानंद याने दीड महिन्यापूर्वी २० गुंठे क्षेत्रात गादी वाफे करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरूण भेंडीचे बी टाकले पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. दीड महिन्यानंतर भेंडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली.
दरम्यान, दयानंदला भेंडीचे उत्पादन घेण्यासाठी त्याचे वडील ज्ञानेश्वर नाना ढोबळे व आई निर्मला मदत करत आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे सर्वच प्रकारच्या शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे तरकारी मालाला चांगला बाजारभाव मिळत आहे. भेंडीलाही सध्या प्रतिकिलोला ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. एक दिवसाआड तोड होत आहे. दोन महिने भेंडीचे उत्पादन सुरू राहणार आहे. सध्या दोन तोडे झाले आहेत.
- दयानंद ढोबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.