पिंपरी - शहरातील पाणीपुरवठ्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत असून, ती दहा टक्क्यांपर्यंत करण्यात येणार आहे. पवना धरणाच्या जलाशयात आज पुरेसा पाणीसाठा असून, तो जुलैच्या मध्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात होणारे बाष्पिभवन, तसेच पावसाळा लांबल्यास सध्याचा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत वापरता येऊ शकेल, या पद्धतीने जलसंपदा व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे.
शहरामध्ये एका भागात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या योजनेचा प्रारंभ एक मार्चपासून करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. पहिले दोन दिवस त्यांनी फारशी कपात केली नाही. पुढील दोन दिवसांत केलेल्या कपातीमुळे काही भागांत पाणीच न पोचल्याने तक्रारी वाढल्या. त्यानंतर सात मार्चला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक भागांत तो विस्कळित स्वरूपात झाला. सर्व भागांत पाणीकपात करताना, पाणीपुरवठा सर्वत्र आता गरजेइतका होऊ लागला आहे. त्यामुळे धरणांतून पाणी घेण्याचे प्रमाण सध्या फारसे कमी झाले नसले, तरी ते प्रमाण हळूहळू वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
पवना धरणांत पावसाळ्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के कमी पाणीसाठा होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने गेल्या ऑक्टोबरमध्येच दहा टक्के पाणीकपात सुरू करण्याची सूचना महापालिकेला केली होती. मात्र राजकीय नेत्यांना मान्यता मिळत नसल्याने कपात करण्यात आली नव्हती. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेची यंत्रणाच पाणीपुरवठ्यासाठी अपुरी पडणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीकपातीच्या निर्णयाला महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
दरम्यानच्या काळात जलसंपदा विभागाने त्यांच्या पाणीवाटपात काटेकोर पद्धतीने नियोजन करीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आठ टक्के कमी राहील याची काळजी घेतली.
पाणीसाठा अब्ज घनफूटमध्ये (टीएमसी)
३.९ आजचा साठा
४५.८१ टक्केवारी
४.६ टीएमसी १२ मार्च २०१८
५३.९५ टक्केवारी
एक टक्का म्हणजे सर्वसाधारणपणे शहराचा तीन दिवसांचा पाणीपुरवठा होतो. म्हणजेच नऊ दिवसांचे पाणी जलसंपदा विभागाने वाचविले. पवना धरणाजवळील विद्युतनिर्मितीची यंत्रणा गेले आठवडाभर दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे धरणातून १९ तास पाणी सोडून चारशे घनफूट प्रति सेकंद (क्युसेक) पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी दोन दिवसांनी विद्युतनिर्मिती यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सहा-सात तासांत हे पाणी सोडण्यात येईल. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हिवाळ्यात रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी घेण्यात येत होते. आता ते ४६० एमएलडीपर्यंत कमी करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ते ४५० आणि नंतर ४४० एमएलडीपर्यंत कमी करण्यात येईल. त्यामुळे दहा टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी करता येईल. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. ते लक्षात घेऊन सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, याची काळजी आम्ही घेत आहोत.
- मकरंद निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.