बसथांब्यांचाच अडसर

बसथांब्यांचाच अडसर
Updated on

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असणाऱ्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगाला पीएमपीचे बसथांबे अडथळा ठरत आहेत. शिवाजी चौकात पीएमपीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चक्राकार वाहतुकीला अडथळा ठरणारे तीन बसथांबे अन्यत्र हलविण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असला तरी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिस पुन्हा एकदा पीएमपीला स्मरणपत्र पाठवणार आहेत. 

सद्यःस्थिती 
हिंजवडी परिसरात चक्राकार वाहतुकीचा प्रयोग सुरू होऊन दीड महिन्याचा अवधी उलटला आहे. आयटीयन्सला त्याचा फायदा होत असल्याचे बोलले जात असले तरी त्यामध्ये काही त्रुटी आहेत. शिवाजी चौकातून येणारी वाहतूक चक्राकार पद्धतीने येत असली तरी मुख्य चौक ते इंडियन ऑइल पेट्रोल पंपादरम्यानचा रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यालगत असणाऱ्या हातगाड्या, रिक्षा, पीएमपीचा बसथांबा यामध्ये भर घालत आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमण काढले होते. त्यानंतर या परिसराने मोकळा श्‍वास घेतला. मात्र, आता पुन्हा परिस्थिती बदलू लागल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसत आहे. चौकाच्या अलीकडील बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे पार्किंगही गर्दीच्या वेळेतही कायम असते. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील सिग्नल यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे. 

रस्त्याच्या कामानंतर नवा प्रयोग
आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या बस तसेच या ठिकाणी येणाऱ्या जडवाहनांची वाहतूक टी-जंक्‍शन, लक्ष्मी चौक, विनोदे वस्ती, कस्तुरे चौक या मार्गे वाकडकडे वळविण्याबाबत पोलिसांचा विचार सुरू आहे. विनोदे वस्तीच्या परिसरात रस्त्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण होईल. त्यानंतर हा प्रयोग करण्यात येईल. जडवाहनांची वाहतूक या मार्गाने वळविल्यामुळे बसमुळे शिवाजी चौकामध्ये होणारी कोंडी थांबणार असून, चक्राकार वाहतुकीमध्ये अधिक सुटसुटीतपणा येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात राबविण्यात येणाऱ्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगावर वाहनचालक खूष आहेत. पीएमपीचे बसथांबे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. हे थांबे अन्यत्र हलविण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. बसथांबे हलविण्यात आल्यानंतर या रस्त्यावरील ताण कमी होणार आहे. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक, हिंजवडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.