PDCC Bank : शेतकऱ्यांना रब्बीसाठी ३१२ कोटींचे पीककर्ज; ४५ हजार जणांना लाभ

पीडीसीसी बॅंकेच्या वतीने चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आज अखेरपर्यंत (ता. १) पुणे जिल्ह्यातील ४४ हजार ६०३ शेतकऱ्यांना एकूण ३११ कोटी ६९ लाख ९० हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
pune district bank
pune district bankSakal
Updated on

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आज अखेरपर्यंत (ता.१) पुणे जिल्ह्यातील ४४ हजार ६०३ शेतकऱ्यांना एकूण ३११ कोटी ६९ लाख ९० हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४९.४८ टक्के झाले आहे.

या पीककर्जाचा जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा झाला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढच्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत (३१ मार्च २०२४) कर्ज वाटप केले जाणार आहे.

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील १ आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार ६२२ शेतकऱ्यांनी पीककर्जाचा लाभ घेतला होता. यंदाच्या आजच्या तारखेला हीच संख्या ४४ हजार ६०३ इतकी झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या रब्बी हंगामाच्या तुलनेत यंदा आजअखेरपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ४ हजार ९८१ ने वाढ झाली आहे.

यामुळे गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरपर्यंतच्या कर्ज वाटपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ७९ कोटी १८ लाख ६७ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

जिल्हा बँकेच्या वतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत आहे. मात्र गेल्या वर्षी केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे शून्य टक्के व्याजाची ही योजना गोत्यात आली होती.

परंतु केंद्र सरकारने सवलतीत कपात केली असली तरी, हा फरक जिल्हा बँकेने भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजाची पीककर्ज योजना चालूच राहणार आहे.

पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने यंदा ६३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंतचे आहे. आतापर्यंत यापैकी ४९.४८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज दृष्टीक्षेपात...

  • रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट --- ६३० कोटी रुपये

  • आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप --- ३११ कोटी ६९ लाख ९० हजार रुपये

  • पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी --- ४४ हजार ६०३

  • पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र --- ३२ हजार ०१ हेक्टर

  • गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरचे वाटप --- २३२ कोटी ५१ लाख २३ हजार रुपये

  • गेल्यावर्षी तुलनेत यंदा वाटपात झालेली वाढ --- ७९ कोटी १८ लाख ६७ हजार रुपये

पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण दोन हजार ५२० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खरिपासाठीचे उद्दिष्ट हे १ हजार ८९० कोटी रुपयांचे आहे. या पीक कर्ज वाटप उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही पात्र शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅक सातत्याने घेत आहे.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.