पुणेकरांनो, धोका कायम आहे!

मास्क लावण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
pune
punesakal
Updated on

पुणे : देशभरात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारी सुरू झाली आहे. तब्बल दोन लाख ऑक्सिजन बेड तयार करण्याची सूचना नीती आयोगाने दिली. या पार्श्वभूमिवर कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही, हे आपल्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे पुणेकरांनो, मास्क काढून बिनधास्त फिरू नकाच. कोरोना संसर्गाची शक्यता पूर्णतः कमी होत नाही, तोपर्यंत स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मास्कशिवाय बाहेर पडू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. (Pune News)

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचे आकडे गेल्या महिन्याभरापासून कमी झालेले दिसतात. तसेच, काही दिवसांपासून निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. दिवसभर दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, कार्यालये नियमित सुरू होत आहेत. त्यामुळे आता कोरोना संपला अशी भावना शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. त्या पार्श्वभूमिवर सोमवारी ‘सकाळ’शी बोलताना हा सल्ला दिला.

पुणे शहरात काही प्रमाणात तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांश नागरिक मास्क वापरत नाहीत. आपल्या शहर आणि जिल्ह्यात अद्यापही कोरोना उद्रेकाचा धोका आहे. त्यामुळे मास्कचा वापर आवर्जून करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मास्कची विक्री घटली

कोरोनाबाधीतांचे प्रमाण वाढत होते, त्या वेळी ‘एन ९५’ पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कची ७० ते ८० टक्के विक्री होत असे. पण, गेल्या महिन्याभरापासून मास्क विक्रीचे प्रमाण १० ते २० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, अशी माहिती औषध विक्रेते चेतन शहा यांनी सांगितली. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच, मास्कमुळे हवेतील प्रदूषणापासूनही बचाव होतो. त्यामुळे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मास्कशिवाय बाहेर पडू नये.’’

pune
सरकारने कितीही रोखले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणार - राम कदम

काय आहे पोलिसांचे निरीक्षण

शहरात गेल्या वर्षीपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना नाक आणि तोंड पूर्ण झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क लावणे बंधनकारक केले आहे. गेल्या दोन महिन्यांपर्यंत नागरिक या नियमांचे कसोशीने पालन करत होते. मात्र, आता रस्त्यावरून बहुतांश जण मास्क न लावता फिरताना दिसतात. विशेषतः दुचाकीवरून फिरणारे तरुण योग्य पद्धतीने मास्क घालत नाहीत.

मास्क महत्त्व वाढलंय

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते. त्यामुळे लोकांना असं वाटत आहे की, मास्कचं महत्त्व संपलंय. ते बिनधास्त मास्क न घालता फिरत आहेत. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, मास्कचं महत्त्व आता वाढलंय. श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा हा विषाणू जोपर्यंत आहे, तोपर्यंत मास्कचे महत्त्व कायम राहणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य खात्याचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

pune
Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही

मास्कमुळे काय होते?

कोरोनाबाधीत रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकण्यातून उडणाऱ्या शिंतोड्यातून विषाणूंचा संसर्ग होतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क महत्त्वाचा ठरतो. तसेच, निरोगी व्यक्तीला संसर्गापासून प्रतिबंधासाठी मास्क उपयुक्त ठरतो.

मास्क कुठे आवर्जून वापरावा

  1. सार्वजनिक ठिकाणी

  2. बंदीस्त वातानुकूलित कार्यालयांत

  3. हॉटेलमध्ये प्रवेश करताना

  4. गर्दीच्या ठिकाणी

  5. मॉल्स खरेदी करताना

  6. रुग्णालयांमध्ये

pune
अफगाणिस्तानातून भारतात परतलेल्या १४६ पैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावायचा नाही. मात्र, त्यापुढील सर्व वयोगटात तीन पदरी कापडी मास्क लावणे आवश्यक आहे. लहान मुलांना ‘एन ९५’ मास्क लावण्याची गरज नाही. पण, अजून पुढे किमान वर्ष ते दोन वर्ष मास्क वापरत रहाणे गरजेचे आहे. लहान मुलांचे अद्यापही लसीकरण सुरू नाही. ते सुरू झाल्यानंतरही मोठ्यांनी आणि लहान मुला-मुलींनी मास्क लावणे आवश्यकच आहे.

- डॉ. शरद आगरखेडकर, बालरोगतज्ज्ञ, विभाग प्रमुख डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.