पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र, तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मास्क वापरण्याच्या जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतील फोटोचा आधार घेतला आहे. त्यातून नागरिकांना भन्नाट संदेश देण्यात आला आहे की, कोरोनाच्या लढाईत....माझी ढाल, माझा मास्क...
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही नागरिक गांभीर्याने नियम पाळताना दिसत नाहीत. पुणे शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक दरम्यान अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता हे टाळण्यासाठी जनजागृतीसाठी प्रशासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी समाजमाध्यमांद्वारे काही कॅम्पेनही राबविण्यात येत आहेत.
‘स्मार्ट पुणे’ ह्या ट्विटर हँडलवरून मास्क वापरण्यासाठी एक भन्नाट संदेश देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये “तलवारीला किती ही धार असो, वार अडवायला ढाल लागतेच!” अस म्हटलंय. सोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील ढाल घेतलेल्याचा फोटो आणि दुसरीकडे त्यांचाच मास्क घातलेला फोटो वापरण्यात आला आहे. यातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या भन्नाट संदेशाला प्रतिसाद देत स्वतः खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर केला. डॉ. कोल्हे यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या ट्विटनंतर लगेचच त्यांच्या हजारो चाहत्यांनी तशाच प्रकारचा मास्क घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करून या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
तसेच, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नागरिकांना मास्क घातलेला फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. परिणामी #माझामास्कमाझी_ढाल हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला. या ट्रेंडमध्ये मराठी कलाकारांसह इतर अनेकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर पुणे शहरात काही ठिकाणी याचे पोस्टरही झळकले.
Edited by : Nilesh Shende
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.