पश्‍चिम महाराष्ट्राचे 'ग्रोथ इंजिन'

Pimpri is the growth engine of western Maharashtra
Pimpri is the growth engine of western Maharashtra
Updated on

तीस-चाळीस वर्षांपूर्वीची पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी ही टुमदार गावे आणि आताचे एक दृष्ट लागावी असे सुखी, समृद्ध महानगर. हा प्रवास खरोखर नोंद घ्यावा असाच आहे. कारखानदारीमुळे 'उद्योगनगरी', तर लाखोंवर श्रमिकांमुळे 'कामगारनगरी' अशी अगदी सुरवातीची ओळख. नगरपालिका काळात (1972 ते 77 च्या सुमारास) जकातीमुळे दरडोई उत्पन्नात सर्वाधिक महसूल होता. देशातच नव्हे तर आशिया खंडातील विक्रमी उत्पन्न होते. त्यामुळे 'श्रीमंत' नगरपालिका असा मानाचा तुरा शिरपेचात होता.

वाढत्या उद्योग, व्यापारामुळे लक्ष्मीचे वरदान लाभलेले हे शहर. विकास कामांचीही रेलचेल. सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेले हे बाळ. आज 25 लाखांचे शहर झाले, पण श्रीमंतीचा तोच रुबाब, तोच तोरा कायम आहे. निसर्गाच्या विविध रंगांची उधळण करणाऱ्या दीडशेवर उद्यानांचा खजिना या नगरीला लाभला आहे. तीस लाखांवर वृक्षारोपण झाल्याने आज हे शहर 33 टक्के हिरवाईने (ग्रीनरी) नटलेले आहे. बंगळूरची बरोबरी करणारे 'उद्यानांचे नगर' अशीही ओळख सांगितली जाते.

अगदी अलीकडे गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले म्हणून स्वच्छ शहराची तुतारी वाजली. सेवा सुविधांची रेलचेल असल्याने केंद्र सरकारने 'बेस्ट सिटी'चा किताब देऊन गौरविले. एका शास्त्रशुद्ध सर्वेक्षणातून हे शहर राहण्यासाठी अव्वल असल्याचे समोर आले. त्यामुळे 'लिव्हेबल सिटी'च्या यादीत वरच्या क्रमांकावर सरकले.

पिंपरी चिंचवडची घोडदौड
गेल्या पंधरा-वीस वर्षांत हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमुळे या शहराचा चेहरा बदलला. अब्जावधी रुपयांची उलाढाल वाढली. त्यातून लाखो हातांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष रोजगार मिळाला. वाहन उद्योगामुळे शहरालगत चाकण, तळेगाव स्टेशनची एमआयडीसी फुलली. मोठी विदेशी गुंतवणूक आली. कारखानदारीने सारे अंदाज कोलमडले. पूर्वी कामाला पिंपरी आणि राहायला पुणे असे समीकरण असे. आता कामाला तळेगाव, चाकण आणि राहायला पिंपरी- चिंचवड असे झाले. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी कितीतरी पटीने वाढले आणि वाढतेच आहे. आता 'संधीचे शहर' झाले. येणाऱ्या प्रत्येक हाताला इथे काम मिळते. अगदी मुंबईप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्राचे 'ग्रोथ इंजिन' पिंपरी चिंचवड झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. इथे सेवा उद्योग आज तब्बल 50 टक्के वेगाने वाढतो आहे. पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या आराखड्यात पिंपरी चिंचवड शहराची वाढ कशी, कुठे, केव्हा होणार याचा दिलेला अंदाज मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. उर्से (ता. मावळ) हे जंक्‍शन होणार आहे. 'एक्‍स्प्रेस वे'ची हायपरलूप सेवा या ठिकाणाहून सुरू होईल. त्याचाच दुसरा अर्थ मुंबई आणि पुणे ही दोन्ही महानगरे भरगच्च झाल्याने आता विकासाची गंगा पिंपरी चिंचवड करांच्या घरी पाणी भरणार आहे.

सुलभ दळणवळण
प्रशस्त रस्ते आणि उड्डाणपूल हे खरे तर या शहराच्या गतिमान विकासाचे खरे गमक. पूर्वीची पीएमटी-पीसीएमटी इतिहास जमा झाली. आठपैकी चार मार्गांवर आज 'बीआरटी' धावू लागल्याने दळणवळण खुले झाले. स्वारगेट ते निगडी 'मेट्रो'चे काम इतके वेगात आहे. कदाचित 2019 मध्ये पुण्यातील पहिली मेट्रो या मार्गावर सुरू होईल. हिंजवडी-चाकण मेट्रोचा प्रस्ताव आहे. पुणे- लोणावळा लोहमार्ग चार पदरीचे काम सुरू होईल. हे सर्व चित्र इतके आशादायक आहे की पुढचे 25 वर्षे पिंपरी चिंचवडकरांचेच आहेत हे निश्‍चित. 

टॉवर सिटी
पूर्वी सात-आठ मजली इमारती मोठ्या वाटत. आता 22 मजल्यांचे शेकडो टॉवर्स झाले. 35 मजल्यांनाही परवानगी मिळाली. त्यामुळे शहराने आकाशाला गवसणी घातली, 'टॉवर सिटी' झाली. पिंपळे सौदागर, गुरव, निलख, रहाटणी या भागांतील नियोजनबद्ध बांधकामांमुळे रिअल इस्टेटला बरकत आली. आता रावेत, पुनावळे, किवळे तसेच मोशी, तळवडे, चिखली, चऱ्होलीच्या वाटा उजळतील असे दिसते. आयटीच्या मोहमायेत गुरफटलेल्या या शहराला फक्त नेतृत्वाची कमी आहे. ती एकदा भरून निघाली पाहिजे. वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या निमित्ताने त्रिखंडात नाव होईल. एक मात्र नक्की आजवर हाल सोसले. आता चांगले दिवस आले. शहर आजा 'स्मार्ट' आहे, पुढेही राहील आणि भविष्यातसुद्धा किनारा मिळेल, अशी अपेक्षा करूया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.