सेनेचे दोन बडे नेते भाजपच्या गळाला

सेनेचे दोन बडे नेते भाजपच्या गळाला
Updated on

पिंपरी - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला स्थान मिळावे यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेतील दोन बडे नेते गळाला लावून मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात जगताप यांनी दिल्लीदरबारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चाही केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.

मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळविण्यासाठी जगताप यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी, तसेच अन्य काही नेत्यांबरोबर चर्चा केली असून, पिंपरी- चिंचवड शहर शतप्रतिशत भाजपमय करण्याचा विडा उचलला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेसह अन्य पक्षांचे काही आमदारही भाजपमध्ये ओढण्याचा जगताप यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या एका नेत्याला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्षपदही बहाल केले जाऊ शकते. तसेच, दुसऱ्या नेत्याला महामंडळ किंवा एखादे मोठे पद दिले जाऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्‍यता आहे.

जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मंत्रिपदासाठी परस्पर सामंजस्य दाखविले आहे. कॅबिनेट मंत्रिपद असेल तर ते जगताप यांना, राज्यमंत्रिपद असेल तर लांडगे यांना, अशी तडजोड झाली आहे. मात्र, तरीही दोघेही स्वतंत्र पातळीवर मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. इतर पक्षांचे नेते किंवा आमदार फोडण्याचा डाव त्यामुळेच आखण्यात आल्याचे समजते.
सोमवारी राष्ट्रवादीतील एक ज्येष्ठ नेते, माजी महापौर आर. एस. कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुमार हे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे समर्थक मानले जातात. 

आता त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्राधिकरणातील आणखी एक ज्येष्ठ नगरसेवक, काळेवाडी येथील एक ज्येष्ठ नेता आणि विद्यमान नगरसेविकाही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती लागण्याची चिन्हे आहेत. या प्रवेशामागेही शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचीच खेळी असल्याचे सांगितले जाते. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अन्य पक्षांकडे एकही आमदार, खासदार राहू नये, याची खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. त्यासाठीच पक्षाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. येणाऱ्या काळात त्याचा प्रत्यय येणार आहे. जगताप यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले, तर राज्य मंत्रिमंडळात त्यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.

दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, हे खरे आहे. परंतु, ते कोणत्या पक्षाचे, त्यांची नावे काय हे आताच सांगणे योग्य नाही. तूर्तास त्यांचा उल्लेख टाळलेलाच बरा.
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

कोणी कुठे जायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्यांना आपण रोखू शकत नाही. ज्यांना विश्‍वासाने अंगाखांद्यावर खेळविले ते पक्ष सोडून गेले. त्यापुढे चिल्लर लोकांनी पक्ष सोडल्याने फरक पडणार नाही.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कोण कुठल्या पक्षात जाणार याची माहिती नाही. गेले दोन-चार दिवस मी शहरात नव्हतो, त्यामुळे त्याची कल्पना नाही. 
- राहुल कलाटे, शहरप्रमुख तथा गटप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.