पिंपरी - महापालिकेत सत्तेत आलेले भाजपचे नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी आवई उठवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेली दोन आंदोलने चांगलीच फायदेशीर ठरली आहेत. कारण येत्या दहा डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप किंवा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरात गेल्या सहा महिन्यांत दोन आंदोलने केली. याची दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारात पिंपरी- चिंचवडला एक मंत्रिपद निश्चित केले. राज्यात भाजपला सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली; पण सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. पिंपरी- चिंचवड शहरात भाजपने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? यासाठी अजित पवार यांनी अडीच महिन्यांपूर्वी जोरदार आंदोलन केले. वाढती महागाई, नोटाबंदी, जीएसटी यांसारखे निर्णय घेऊन जनतेला खाईत लोटले, स्मार्टसिटीसाठी अद्याप एक रुपयाही मिळाला नाही, शहरातील रेडझोन, पाणीटंचाई, मिलिटरीच्या जागा ताब्यात घेणे, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर याचा लाभ अद्याप संबंधितांना झालेला नाही, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर अजित पवार यांनी "जन हाहाकार' आंदोलन केले. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नेते संग्राम कोलते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रश्नांवर "महापालिका जबाब दो' आंदोलन केले. या दोन्ही आंदोलनांना जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. अजित पवार यांनी केलेल्या आंदोलनाला सुमारे आठ हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाचा इत्थंभूत रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला. त्यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. शहराची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराचे निमित्त करत पिंपरी- चिंचवडसाठी एक मंत्रिपद निश्चित केले.
10 डिसेंबरला शपथविधी
आमदार लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे यांना मंत्रिपद देण्याचे यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. पण, ते मिळेलच याची खात्री नव्हती. आता, अजित पवार यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांकडून समजते. दरम्यान, नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांवरून मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचे सांगण्यात येते. राणे यांच्या नावासाठी स्वत: मुख्यमंत्री, तर खडसे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आग्रही आहेत. दोन्हीपैकी एकालाच मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी येत्या 10 डिसेंबरला सह्याद्री अतिथिगृह शपथविधीसाठी राखून ठेवले असून, त्यानंतर 12 डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
|