पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे मूळचा अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. वाहने चालविताना त्रेधातिरपिट उडते. सकाळी, सायंकाळी विशेषतः गुरुवार, रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची परीक्षा घेणारी ठरते.
अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग दखल घेत नाही. वाहतूक पोलिसांकडूनही रस्ता दुर्लक्षित आहे. पीएमपीची सेवा या मार्गावरून आहे, मात्र त्यासाठी कोठेही बसथांबा निवारा नाही. त्यामुळे अनेकदा गर्दीत थांबलेल्या पीएमपी गाडीत प्रवासी चढ-उतार करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा रस्त्यातच हात करून पीएमपी बस थांबविण्याची विनंती प्रवासी करीत असतात. या गाड्या थांबल्या की त्यामागील वाहतूक ठप्प होते.
लग्नसराईच्या काळात या रस्त्यावरून वरात निघते, तेव्हा तर वाहतूक कोंडीचा कहरच होतो. तासन्तास वाहने जागीच खोळंबून राहतात. वाहनांच्या गर्दीतून आणि अतिक्रमणाच्या विळख्यातून वाट काढणाऱ्या स्थानिक नागरिकांना रोजच या परिस्थितीचा सामना करावा लागतो.
भोसरी ते शास्त्रीचौक, दूर्वांकुर लॉन्स मंगल कार्यालयापर्यंत पीएमपीचा एकही बसथांबा नाही. रस्ता दुभाजक नाही. वाहनतळ नाही. त्याशिवाय पुणे रेल्वे स्थानक, विमाननगर, लोहगाव, आळंदी येथे जाणारे कर्मचारी रस्त्याचा वापर करतात. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांत एकदाही अतिक्रमण विरोधी कारवाई झालेली नाही. पथारीवाल्यांना स्थानिक राजकारण्याचा पाठिंबा आहे. महापालिका कारवाई करीत नाही.
नागरिकांच्या मते
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासारखा हा आळंदी रस्ता झाला आहे. सकाळी व संध्याकाळी रोजच वाहनांची गर्दी असते. लग्नसराईत दिवसभर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा असतात. गुरुवार आणि रविवारी वाहनांच्या गर्दीतून रस्ता ओलांडता येत नाही. पदपथांवर फेरीवाले व व्यापाऱ्यांनी वस्तू ठेवल्यामुळे नागरिकांना चालता येत नाही.
- कामिनी वाडेकर, गृहिणी
आळंदी, पुणे रेल्वे स्थानक, लोहगाव, विमाननगरला जाणाऱ्या कॅब, कंपन्यांच्या गाड्यांची संध्याकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत गर्दी असते. सण, उत्सवाच्या वेळी गर्दीमुळे कुटुंबांसोबत बाहेर पडता येत नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा निश्चित करावी.
- भूषण क्षीरसागर, व्यावसायिक
सकाळ- संध्याकाळ ट्रॅफिक जॅम होते. स्थानिक नागरिक व खासगी वाहनचालक अरेरावी करतात. पीएमपी गाडी प्रवाशांनी पूर्ण भरलेली असतानाही त्या गाडीत प्रवेश करण्यासाठी लोक प्रयत्न करतात.
- माधुरी मशीदकर, व्यावसायिक
वाहतूक कोंडीमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होते. रस्त्यालगत घरे व हॉस्पिटल आहेत. वाहनांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने वृद्ध, लहान मुले, रुग्णांना त्रास होतो. व्यापाऱ्यांसाठी पार्किंगची सोय नाही. दिघी रोडचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. जागोजागी बसथांबे उभारावेत. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत होईपर्यंत तिथेच ठाण मांडावे.
- अनुराधा गोफणे, नगरसेविका
अरुंद रस्त्यावर एक गाडी बिघडली, तरी संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो. त्यातून वाहन पुढे नेताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी अपघात होण्याची भीती असते.
- सतीश उमप, वाहनचालक, पीएमपीएमएल
लग्नसराईच्या काळात पार्किंगची समस्या निर्माण होते. पर्यायी रस्त्याची व्यवस्था नाही. ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने काही वेळा वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस नियुक्त केले आहेत.
- ए. आर. ओंबासे,
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, भोसरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.