Bhuleshwar Mandir and Daulatmangal Gad पुणे परिसर दर्शन : भुलेश्वर मंदिर आणि दौलतमंगळ गड

पुण्यापासून सोलापूर रस्त्याला ४५ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर हे शंकराचे जुने मंदिर आहे. साधारणतः आठव्या ते बाराव्या शतकात या मंदिराभोवती एक गड बांधला, तो म्हणजे दौलतमंगळ गड.
bhuleshwar mandir and daulatmangal gad
bhuleshwar mandir and daulatmangal gadsakal
Updated on
Summary

पुण्यापासून सोलापूर रस्त्याला ४५ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर हे शंकराचे जुने मंदिर आहे. साधारणतः आठव्या ते बाराव्या शतकात या मंदिराभोवती एक गड बांधला, तो म्हणजे दौलतमंगळ गड.

पुण्यापासून सोलापूर रस्त्याला ४५ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर हे शंकराचे जुने मंदिर आहे. साधारणतः आठव्या ते बाराव्या शतकात या मंदिराभोवती एक गड बांधला, तो म्हणजे दौलतमंगळ गड. एका छोट्या टेकडीवर बुरूज आणि तटबंदी बांधून हा छोटेखानी किल्ला बांधला. १६२९ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव येथे होता असा पहिला उल्लेख आढळतो.

आज बुरूज, वर जाणारी वाट, दरवाजा चांगल्या अवस्थेत असून, पुण्यावर जेव्हा आदिलशाही हल्ला झाला आणि पुणे बेचिराख झाले, त्यावेळी पुण्यातील व्यापारी आणि बरीच प्रतिष्ठित मंडळी येथे वास्तव्यास आली होती असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्यात येण्याआधी पुण्याचा कारभार येथूनच काही वर्षे चालला. असे असले तरी भुलेश्वर मंदिर बरेच जुने म्हणजे आठव्या ते बाराव्या शतकातील आहे. मंदिराच्या मागील बाजूस चुन्याचा घाणा आहे.

मंदिरात प्रवेश करताना दोन्हीही बाजूंना जिने आहेत, त्याआधी उजव्या बाजूला गणेश आणि डाव्या बाजूला विष्णू यांची प्रतिमा आहे. जिना चढून वर गेल्यावर मंदिरात प्रवेश होतो. मोठा नंदी आणि त्याच्याशेजारी कासव असून पुढे सुंदर कोरीव मंदिरात शिवपिंड आहे. प्रदक्षिणा मार्गावर तीन ते चार थर मूर्तिकाम आहे. सर्व मूर्ती मुस्लिम आक्रमकांनी ठरवून फोडल्याचे लक्षात येते.

प्रदक्षिणा सुरू केल्यावर सर्वांत वरच्या थरात गणेशाची स्त्रिरुपातील प्रतिमा आहे, याला गणेशी असे म्हणतात. बाकी अनेक देव, गंधर्व, यक्ष यांच्या मूर्ती आहेत. काही युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. मंदिर आणि कडेची भिंत यांच्यामधील भागात छत नाही, त्यामुळे वरून डोकावणारा प्रकाश कोरीव कामाला वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देतो. नंतरच्या काळात मंदिराचे शिखर चुन्यात बांधलेले आहे, त्यावर घुमट आणि नक्षीदार खांब आहेत. चार घुमट नक्षीकामामुळे उठून दिसतात. मंदिराबाहेर पोर्तुगीज घंटा आहे.

काय पहाल?

दौलतमंगळ किल्ला, बुरूज तटबंदी, प्रवेशद्वार, मंदिर, कळस आणि शिखर, आतील कोरीवकाम, नंदीच्या पाठीवरील छोट्या घंटांची माळ, प्रदक्षिणा मार्गावरील कोरीव काम, मंदिराबाहेर असलेली घंटा.

कसे पोहचाल

पुणे ते सोलापूर महामार्गावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला भुलेश्वर मंदिर दिसते. सासवडहून यवतला बसने जाता येते. याशिवाय स्वतःच्या वाहनाने किंवा यवतहून रिक्षाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.