Karla Caves : पुणे परिसर दर्शन : कार्ला लेणी

लोणावळा परिसरात बरेच लेणी समूह आहेत, त्यातील कार्ल्याची लेणी कोरीव कामामुळे खूप प्रसिद्ध आहेत.
Karla Caves
Karla CavesSakal
Updated on
Summary

लोणावळा परिसरात बरेच लेणी समूह आहेत, त्यातील कार्ल्याची लेणी कोरीव कामामुळे खूप प्रसिद्ध आहेत.

लोणावळा परिसरात बरेच लेणी समूह आहेत, त्यातील कार्ल्याची लेणी कोरीव कामामुळे खूप प्रसिद्ध आहेत. १६ लेणींचा हा समूह असून, ही महायान पंथीय बौद्ध लेणी आहेत. याचे चैत्यगृह भारतातील सगळ्यांत मोठ्या चैत्यगृहांपैकी एक आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. लेणीपर्यंत जायला पायथ्यापासून ३०० पायऱ्या चढून जावे लागते. या लेणीच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांची नेहमी वर्दळ असते. कोळी बांधवांसह अनेकांची ही कुलदेवी आहे. आश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रोत्सवात येथे उत्सव असतो.

बौद्ध लेणी इसवी सन पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहेत. भव्य चैत्यगृह, दारापाशी डाव्या बाजूला स्तंभशीर्ष आहे. हा ४५ फुटांचा उंच वर्तुळाकार बैठकीचा स्तंभ असून, तो १६ कोनांमध्ये घडविलेला आहे. त्याच्यावर एक आवळ्याप्रमाणे गोलाकार कोरीव काम आहे, त्याला अमलक असे म्हणतात. त्यावर हर्मिकेचा चौथरा आहे; ज्याच्यावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे, त्याला स्तंभशीर्ष असे म्हणतात. असे स्तंभशीर्ष बऱ्याच ठिकाणी आढळतात. काही स्तंभांवर हत्ती आणि घोडे कोरलेले आहेत. चैत्यगृहाच्या सज्जामध्ये मिथुन शिल्पांच्या जोड्या, हत्तींचे थर, अनुयायांसह गौतम बुद्ध असलेले शिल्पपट आहेत.

मिथुन शिल्पातील स्त्री मूर्तीवर सुबक दागिने कोरलेले दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. प्रसादांच्या तळाशी तीन हत्तींची शिल्पे आहेत. डाव्या बाजूला हत्तींच्या शिल्पावर गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या सज्जात लेणी खोदणाऱ्याचा शिलालेखसुद्धा आहे. कार्ला लेणीत ब्राह्मी लिपीतील एकूण ३५ शिलालेख दिसून येतात. बहुतेक शिलालेख दानधर्मविषयक आहेत; पण एका ठिकाणी ‘मामलहारे’ असा शब्द आहे.

‘आहार’ म्हणजे ठराविक गावांचा प्रशासकीय प्रदेश आणि ‘मामल’ म्हणजे मावळ. हा मावळचा सर्वांत जुना उल्लेख असावा. या शिलालेखातून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.

काय पहाल?

भव्य चैत्यगृह, स्तूप, हत्ती स्तंभ, सज्जातील कोरीव काम, एकवीरा देवी मंदिर व इतर देवी-देवतांची मंदिरे.

कसे पोहचाल

लोणावळ्याहून रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनानेही जाता येते.

प्रवेश शुल्क - २५ रुपये.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.