देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना... असा 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात मोदींचे स्वागत करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते.
ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला.
मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले.
मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.