पुणे : माजी नगरसेविका आणि गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा हा पक्षप्रवेश सध्या चर्चेचं कारण ठरला आहे. गुंड गजा मारणे हा 'मोक्का'अंतर्गत जेलमध्ये आहे. तर दुसरीकडे त्याच्या पत्नीने पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी मध्ये इन्कमिंग सुरू झाल्याची चर्चा आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी असा दावा केला होता की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीतील तब्बल १५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वक्तव्याच्या धर्तीवर आज मारणे यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २०१२ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मारणे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले असून येत्या काळात यात आणखी वाढ होणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितलंय. महापालिकेची पाच वर्षांची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १५ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी ही संख्या वाढत जाईल, असा दावा जगताप यांनी केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायचीच असा चंग राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यासाठी दोन्ही शहराध्यक्षांना ताकद देण्यात येत आहे. भाजपाकडे सध्या असलेल्या नगरसेवकांमध्ये बहुसंख्यजण गेल्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आहेत. पाच वर्षानंतर या साऱ्यांची घरवापसी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपाला कमकुवत करून दोन्ही शहरातील सत्ता ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.