पुणे रेल्वे स्टेशनपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुजर निंबाळकरवाडीचा महापालिकेत समावेश झाला; परंतु आता तरी गावाचा विकास होणार का? की ‘आगीतून उठलो अन् फुपाट्यात पडलो’ अशी अवस्था होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. भौगोलिकदृष्ट्या डोंगरउतारावर गाव असून गावाला नागरी समस्यांनी विळखा घातला असल्याचे दिसते. ग्रामपंचायत असताना गावचा विकास न झाल्याने महापालिकेतील समावेशानंतर गावचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुजरवाडी आणि निंबाळकरवाडी अशा दोन छोट्या वाड्या मिळून २००२ मध्ये गुजर- निंबाळकरवाडी या स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाली. स्थापनेनंतर सुरवातीला काही प्रमाणात गावात विकासकामे झाली, परंतु, कालांतराने गावाचा विकास खुंटल्याचे चित्र दिसत आहे. गावातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून कात्रजला म्हणजेच शहराला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. पाझर तलावाखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत असला तरी गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून, काही ठिकाणी कूपनलिकेच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे.
गावात डोंगरावर उंच-उंच इमारती पाहायला मिळत असून अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे. अशा परिस्थितीत गावातील हिलटॉप झोनचा विचार करता गावाला गावठाणचा दर्जा मिळावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
गुजर- निंबाळकरवाडीत आंबिल ओढ्याचे उगमस्थान आहे. ओढ्याचे पाणी हे नागरी वसाहतीत शिरल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ओढ्यावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे कमी व्हायला हवीत. त्याचसोबत गावातील कचऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर पायाभूत सुविधा मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
(उद्याच्या अंकात - मांगडेवाडी)
ग्रामस्थ म्हणतात...
गणेश काळे (माजी उपसरपंच) - महापालिकेत तीन वर्षांपूर्वी ११ गावांचा समावेश केला होता. आज त्या गावांची परिस्थिती पाहता केवळ गावातून करसंकलन होईल, मात्र विकास होणार नाही, अशी भीती सातत्याने वाटत राहते.
संतोष बालवडकर - सरकारने किमान सपाट जमिनींवर आर झोन जाहीर करावा, तसेच खराब रस्त्यांमुळे धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका व्हावी, ही अपेक्षा.
दृष्टिक्षेपात गाव...
गावाच्या समावेशाचा निर्णय हा स्वागतार्ह असून, प्रलंबित कामे मार्गी लागतील. गावात शून्य टक्के आर झोन असून, महापालिका समावेशानंतर गावाला गावठाणाचा दर्जा मिळण्याबरोबर निवासी झोन व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
- दीपक गुजर, माजी सरपंच
(उद्याच्या अंकात वाचा मांगडेवाडी गावाचा लेखाजोखा.)
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.