किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस

अरुंद असलेला किरकटवाडी गावातील एकमेव मुख्य रस्ता.
अरुंद असलेला किरकटवाडी गावातील एकमेव मुख्य रस्ता.
Updated on

विमा ग्राम पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार आणि पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावून जिल्ह्यासह राज्यभरात नावलौकिक मिळवलेले किरकटवाडी गाव सध्या मात्र मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य अशा वेगवेगळ्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि अनियंत्रितपणे वाढलेल्या नागरीवस्तीमुळे गावपण हरवून बसलेले आहे. विकासात्मक समतोल साधताना किरकटवाडीच्या बाबतीत महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी गावासाठी एकमेव अरुंद रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकवस्ती, वाहनांची संख्या आणि अवजड डंपर वाहतूक यामुळे मुख्य चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असते. किरकटवाडीला पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकलेला नाही. विभागीय नियोजनात नऱ्हे-धायरी-किरकटवाडी-खडकवासला असा रस्ता मंजूर आहे, मात्र कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी १९८४-८५ दरम्यान नांदेड येथून वाहिनी आणली आहे. सध्या किरकटवाडीत पिण्याच्या पाण्याची  साठवण क्षमता ११ लाख लिटर असून दैनंदिन गरज सुमारे ३० लाख लिटरची आहे. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर किरकटवाडीसाठी शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक असणार आहे.

सध्या किरकटवाडीचे सांडपाणी थेट ओढ्यात सोडलेले आहे. कचरा प्रक्रीया प्रकल्प आणि सांडपाणी प्रकल्प ही विकासासाठी महत्त्वाची गरज आहे.दोन वर्षांपासून किरकटवाडील शेती आणि शिवनगरचा काही भाग अतिवृष्टीमुळे प्रभावित होत आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य उपाययोजना व्हायला पाहिजे.

दृष्टिक्षेपात गाव...

  • ८९४१ - २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
  • ३१८ हेक्‍टर क्षेत्रफळ
  • गोकुळ करंजावणे - सरपंच
  • १७ सदस्यसंख्या
  • १६ कि.मी. स्टेशनपासून अंतर 
  • वेगळेपण : शिवकालीन भैरवनाथ व महादेवाचे मंदिर

ग्रामस्थ म्हणतात...
धोंडीबा सोनवणे ( अध्यक्ष-जनसेवा ज्येष्ठ नागरिक संघ) : सध्या मोठ्या प्रमाणात धूळ असल्याने आम्हाला बाहेर बसणे अवघड होत आहे. अवजड वाहतुकीमुळे आम्हाला चालायला जाणेही शक्य होत नाही.

अपूर्वा अंकुश हगवणे (विद्यार्थिनी) : रस्ता लवकर व्हावा. वाहतूक कोंडीमुळे शाळा, कॉलेजला जाताना तासनतास अडकून पडावे लागते. बंद असलेली बस सुरू करावी.

नरेंद्र हगवणे (माजी उपसरपंच) : गावाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र शासकीय प्रकल्पांसाठी अधिग्रहीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे उर्वरित जागेवर आरक्षण टाकताना नागरिकांवर अन्याय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. भविष्याची गरज विचारात घेऊन सर्वंकष विकास आराखडा तयार करावा.

बाळासाहेब हगवणे (कृती समिती सचिव) : २००० पासून गावं महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात यावीत यासाठी मी प्रयत्न करत आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून किरकटवाडीचा विकास व्हावा.

जड वाहतुकीबाबत नियोजन करावे. महिलांसाठी अस्मिता केंद्र,लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व गार्डन महानगर पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपलब्ध करावीत.
- किरण हगवणे, माजी उपसरपंच

(उद्याच्या अंकात वाचा नांदेड गाव​ गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.