मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव

मांगडेवाडी - सांडपाणी वाहिनीचे पाणी ओढ्यात सोडल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
मांगडेवाडी - सांडपाणी वाहिनीचे पाणी ओढ्यात सोडल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
Updated on

महापालिकेत समावेश झाल्यानंतर मांगडेवाडी गावातील नागरिक सकारात्मक असल्याचे चित्र आहे. ‘कुस्ती आणि पहिलवानकीचा वारसा जपणारे गाव’ म्हणून मांगडेवाडीची ओळख असली तरी  ग्रामपंचायत असताना जो विकास झाला नाही तो महापालिकेत होईल, अशी अपेक्षा लोकांना आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावात महापालिकेची १० कोटी रुपयांची सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली असली तरी ती पुढे जोडली न गेल्यामुळे सांडपाणी वाहिनीचे मैलापाणी ओढ्यात सोडले जात आहे. कात्रज तलावालाही काही प्रमाणात याची झळ बसत आहे. सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. गावात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे. ओढ्याला लागूनच गगनाला भिडणाऱ्या इमारती उभ्या असल्याचे चित्र दिसत असून, यातून ओढ्यावरील अतिक्रमणे भविष्यकाळात धोका निर्माण करू शकतात.

२००२ मध्ये मांगडेवाडीच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गाव पुणे- बंगळुरू महामार्गालगत असून काही प्रमाणात गावातील रस्तेही सुस्थितीत आहेत, मात्र कचरा आणि पाण्याच्या समस्येमुळे नागरिक वैतागले असून या त्रासातून सुटका व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. गावात सध्या कात्रजच्या जुन्या विहिरीतून आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी छोट्या टॅंकरसोबत कूपनलिकेचा आधार घ्यावा लागत आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही.

ग्रामपंचायतीत महिलाराज असून महिलांच्या समस्यांकडेच ग्रामपंचायतीचा काणाडोळा झाल्याचे चित्र आहे.  गावात स्मशानभूमी नसल्यामुळे  लोकांना अंत्यविधीसाठी कात्रजच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागतो. गाव हिलटॉप असून गावात रहिवासी झोन नसल्यामुळे आर झोनची मागणी होत आहे. त्याचबरोबर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा उत्खननामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून, त्यातून धुलिकणाची समस्या निर्माण झाली आहे.

दृष्टिक्षेपात गाव...
३९७० लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) सध्या अंदाजे पंधरा हजार
२१३.६१ हेक्‍टर क्षेत्रफळ
सरपंच - अर्चना मांगडे
सदस्य संख्या - १२
पुणे स्टेशनपासून अंतर :  १३ किलोमीटर
गावाचे वेगळेपण : काळभैरवनाथाचे प्राचीन मंदिर, कुस्ती आणि पहिलवानकीचा वारसा जपणारे गाव

ग्रामस्थ म्हणतात...
सुनील मांगडे - गावात रहिवासी झोन नसल्यामुळे गावातील सर्व बांधकामे अनधिकृत आहेत. त्यामुळे शासनाने किमान सपाट भाग तरी आर झोन जाहीर करावा, ही महापालिकेत गेल्यानंतर आमची प्रमुख मागणी राहील.

अनिल मांगडे - गावे घेण्यास विरोध नाही, परंतु गावातील पाण्याचा प्रश्न महापालिकेत गेल्यावर सुटावा ही अपेक्षा आहे. गावात आतापर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन नव्या बांधकामांबाबत नवीन निर्णय घ्यावा. 

महेश मांगडे - गाव शहरालगत असल्याने पंचायतराज व्यवस्थेतील कुठलाही लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य गावाकडे फिरकत नाही. त्यामुळे महापालिकेत झालेल्या समावेशाने गावाचा विकास होईल असे वाटते.

यापूर्वी महापालिकेत समावेश झालेल्या ११ गावांचा विचार केल्यास त्या गावांची अवस्था पाहून महापालिकेत समावेश होऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. विकासकामे झालेली नसून नागरी प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भ्रमनिरास होऊ नये ही अपेक्षा आहे. 
- विलास मांगडे, माजी सरपंच

(उद्याच्या अंकात वाचा कोळेवाडी​ गावाचा लेखाजोखा.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.