आरक्षणे टाकताना शेतकऱ्यांना हवा न्याय 

आरक्षणे टाकताना शेतकऱ्यांना हवा न्याय 
Updated on

पुणे महापालिकेकडून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या अकरा गावांना सध्या विकासासाठी झगडावे लागत असल्याने तो पूर्वानुभव पाहता आता नव्याने समाविष्ट होणाऱ्या सूस गावाची अवस्था तशी होऊ नये, असे येथील स्थानिक जनतेचे मत आहे. 

गावातील अनेकांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकल्या असल्याने ब-याच जणांकडे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे अल्पभूधारकांच्या जागेवर आरक्षण न टाकता ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, अशा जागांवर आरक्षण टाकण्यात यावे, असा सूर या गावातील नागरिकांकडून येत आहे. याबरोबरच गावातील सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा, कच-याचे नियोजन, सांडपाणी, रस्त्यांची कामे, स्मशानभूमीची समस्या यांसारख्या समस्या  महापालिकेत आल्यावर लगेच सोडवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला अतिक्रमणांना अटकाव करण्यासाठी येणाऱ्या मर्यादा पाहता महापालिकेला यावर लगाम लावावा लागणार आहे. 

येथील स्थानिक व नोंदणीकृत लोकसंख्येपेक्षा बाहेरून राहायला आलेल्या तसेच भाडेकरूंची संख्या आजमितीला वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या चार हजार आठशे होती, परंतु सध्या ही संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामुळे नियमीत पाणी पुरवठा करणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर आहे. शहराच्या हद्दीलगत असल्याने बेकायदा बांधकामाची बेसुमार वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने व्यवसाय वाढले आहेत. सूस गावातून पिरंगुट, नांदे-चांदे, हिंजवडीला जाणारा रस्ता असल्याने या परिसरात कायम वर्दळ असते. तसेच येथील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांचीही वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे, तसेच रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. 

सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा नसल्याने ओढ्यात पाणी सोडले जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

ग्रामपंचायतीला मिळणारा कराच्या स्वरुपातील निधी मर्यादित असल्याने या समस्या सोडविणे शक्य होत नाही, त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर अनेक सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत.

ग्रामस्थ म्हणतात...
दिशा ससार (उपसरपंच) - गावातील कच-याचे नियोजन, पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असून अंतर्गत रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. या सगळ्या समस्या महापालिकेच्या माध्यमातून सुटायला हव्यात.

कन्हैया बोडके (रहिवासी, त्रिमूर्ती एलिना) - गावात सोसायट्यांचे प्रमाण वाढल्याने पाणीपुरवठा, मल:निसारण व रस्त्यांची कामे या तीन महत्त्वाच्या बाबींवर काम करणे आवश्यक आहे. यामुळे सोसायट्यांच्या मासिक खर्चात अनावश्यक वाढ होत आहे.

सूस गावातील पिण्याचे पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासह  नियोजनबद्ध विकास करुन सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. जमिनीवर आरक्षण टाकताना शेतक-यांवर कुठलाही अन्याय होऊ नये. बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत, त्याचा आरक्षणासाठी विचार व्हावा. 
-अपूर्वा निकाळजे, सरपंच

दृष्टिक्षेपात गाव...
४८०० लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सध्या एक लाखाच्या जवळपास
५२३ - हेक्टर क्षेत्रफळ 
अपूर्वा निकाळजे - सरपंच
१४ -सदस्यसंख्या
१७.५ कि.मी. स्वारगेटपासून अंतर 
वेगळेपण : शहरालगत असल्याने निमशहरीपणा, काळभैरवनाथ मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.