वाघोलीकरांना वेध विकासाचे

वाघोली - पुरातन वाघेश्वर मंदिर आणि सभोवताली असलेले तळे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.
वाघोली - पुरातन वाघेश्वर मंदिर आणि सभोवताली असलेले तळे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.
Updated on

एका वेशीच्या आत वसलेले आणि आजूबाजूला शेती असलेले
पुणे - नगर महामार्गावरील पंधरा वर्षांपूर्वीचे वाघोली हे टुमदार गाव, आता मात्र  शेकडो टोलेजंग इमारतींच्या विळख्यात अडकले आहे. पुरातन वाघेश्वर मंदिर, त्याकाठी असलेले तळे, सरदार पिलाजीराव जाधवराव यांची समाधी ही वाघोलीची वैशिष्ट्ये. पाणी, कचरा, वाहतूक कोंडीने ग्रामस्थ त्रस्त. आजमितीस लोकसंख्या अडीच लाखांच्या पुढे गेल्याने विकास ग्रामपंचायतीच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. त्यामुळे आता महापालिकेतील समावेशानंतर वाघोलीकरांना वेध लागले आहेत सर्वांगीण विकासाचे.

वाघोली गाव चोहोबाजूंनी विस्तारत असताना आज शैक्षणिक हब म्हणूनही नावारूपाला आले आहे. गाव जकात नाक्‍याच्या बाहेर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गोदामांची संख्या आहे. दगडखाणीचा व्यवसायही तेजीत चालतो. त्यामुळे धुळीचे प्रचंड प्रमाण आहे. पूर्वी नागरिकांना विहिरीतून अथवा जलवाहिनी गेलेल्या नळकोंड्यातून डोक्‍यावर पाणी आणावे लागत. त्यानंतर महापालिकेकडून पाणी पुरवठा सुरू झाला. सध्यस्थितीत ग्रामपंचायतीने केलेल्या पाणी पुरवठा योजनेतून नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र ते पाणी अपुरे असल्याने सोसायटीधारकांना विकतचे टॅंकरने पाणी घ्यावे लागते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमआरडीएच्या माध्यमातूनही पाणीपुरवठ्याची एक योजना टाकण्यात आली आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. मात्र भामा आसखेडचे पाणी मिळाल्यास पाण्याचा प्रश्न पूर्ण सुटणार आहे. गावात रस्ते, सांडपाणी वाहिन्यांसह अन्य विकासकामे सुरू आहेत. पूर्वी हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जसजसा विस्तार झाला तसे राजकीय समीकरणे बदलली. सध्यस्थितीत सरपंच व काही सदस्य राष्ट्रवादीचे आहेत, तर अन्य सदस्य शिवसेना, भाजपचे आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये बाबूराव पाचर्णे आमदार झाल्यानंतर काहीसे भाजपमय झालेले वातावरण यंदा राष्ट्रवादीचे अशोक पवार निवडून आल्यानंतर पुन्हा काहीसे राष्ट्रवादीमय झाले आहे.

मिळकतकरात वाढ होणार असली, तरी अनेक सुविधा मिळणार आहेत. महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत नागरिक करीत आहेत. त्वरित जरी विकास नाही झाला तरी भविष्यात विकास होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाघोलीचा विस्तार आता ग्रामपंचायतीच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. यामुळे महापालिका योग्य पर्याय असल्याचे नागरिक सांगतात.

ग्रामस्थ म्हणतात...
संजयकुमार पाटील (नोकरदार) - गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ग्रामपंचायतीकडून सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका समावेशानंतर वाघोलीचा गतीने विकास होईल.
नाना सातव (स्थानिक रहिवासी) - महापालिकेशिवाय वाघोलीचा विकास होणार नाही. ग्रामपंचायत बघता राजकीय नुकसान होईल. मात्र गावाचा विकास महत्त्वाचा आहे.
सरला फडतरे (गृहिणी) - महापालिकेत समावेश करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असून, त्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होईल असे वाटते.

दृष्टिक्षेपात...

  • अडीच लाख लोकसंख्या
  • २८८० हेक्‍टर क्षेत्रफळ
  • १७ ग्रामपंचायत सदस्य
  • सरपंच - वसुंधरा उबाळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • अंतर - पुणे स्टेशनपासून १२ किलोमीटर
  • वेगळेपण - ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव. पुरातन वाघेश्वर मंदिर, सरदार पिलाजीराव जाधवराव यांची समाधी. शैक्षणिक हब म्हणूनही नावारूपाला.

झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व विस्तार बघता ग्रामपंचायतीला पुढे विकास करणे अवघड आहे. यामुळे सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.  
- वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.