चाळीतील पोलिसांना आता टॉवरमधील घर

Home
Home
Updated on

पुणे - टुमदार अन्‌ देखणा हॉल, तितक्‍याच चांगल्या दोन बेडरूम, ट्रॉलीयुक्त किचन... त्यामध्ये खेळणारी मोकळी हवा. त्याचबरोबर हॉल, बेडरूम, किचन या तिन्हींसमोर दिसणारी गर्द हिरवी झाडी अन्‌ हिरवेगार मैदान!.. हे वर्णन तुम्हाला एखाद्या उच्चभ्रू सोसायटीतील महागड्या मॉडर्न घराचे वाटले असेल. हो ते खरे आहे; पण त्या २२ मजली टॉवरमधील मॉडर्न घरे कोण्या गर्भश्रीमंतांसाठी नव्हे, तर ती आहेत पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर पेलणाऱ्या पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्सिस्टंट फाउंडेशनकडून अत्याधुनिक सोई-सुविधांयुक्त गगनचुंबी इमारत उभारण्यात आली असून, पाडव्याच्या मुहूर्तावर पोलिसांचा त्यामध्ये गृहप्रवेश होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटिशकालीन चाळी आणि स्वातंत्र्योत्तर काळात उभारलेल्या पोलिस वसाहतींमधील इमारतींमध्ये पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे वास्तव्य करीत आहेत. गळणारे छत, पापुद्रे निघणाऱ्या भिंती, घुशी-उंदरांचा सुळसुळाट झालेली स्वच्छतागृहे, पाण्याचा कायम अभाव अशा वातावरणात कुटुंबासह राहून शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांकडून पार पाडली जाते. अनेकदा पाण्यासाठी, चांगल्या घरांसाठी पोलिसांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये बहुमजली इमारत बांधण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केले. तत्कालीन आमदार विजय काळे यांच्या पुढाकाराने व पर्सिस्टंट फाउंडेशनच्या प्रयत्नातून २२ मजल्यांचे दोन निवासी टॉवर बांधण्याचे काम ऑक्‍टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. 

याविषयी माजी आमदार विजय काळे म्हणाले, ‘‘पोलिसांसाठी चांगली घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पर्सिस्टंट फाउंडेशनने या प्रकल्पाचे बांधकाम करून ते हस्तांतरित करण्याचे मान्य केले. त्यानुसार हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.’’

प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असून, त्यानंतर ते पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतील, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

असे आहे घर
२ टॉवर
१६८ घरे
५५० चौ.फू. घरांचे क्षेत्रफळ

शिवाजीनगर येथील पोलिसांच्या निवासी टॉवरचे काम पर्सिस्टंट फाउंडेशन व दादा देशपांडे यांनी केले आहे. त्यांनी पुणे पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी या प्रकल्पाद्वारे मोठे योगदान दिले आहे. काही दिवसांतच इमारतींचे काम पूर्ण होईल.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त 

या टॉवरमध्ये अत्याधुनिक सोईसुविधा व चांगल्या दर्जाची मॉडर्न घरे पोलिसांसाठी बांधली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनाही नसतील, अशी घरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या घरांमुळे पोलिसांच्या आयुष्यात मोठा बदल घडेल.
- गणेश वाबळे, व्यवस्थापक, पर्सिस्टंट फाउंडेशन 

आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. मात्र नव्या घरात राहण्याची संधी मिळाल्यास आमच्या कुटुंबांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी सकारात्मक होईल.
- हर्षदा मोहिते, पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()