पुणे : एमआयटी खासगी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून ‘आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा’ (इंटरनॅशनल स्टडी टूर) आयोजित करण्यासाठी लाखो रुपये घेतले. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागल्याने हा दौरा आयोजित करणे शक्य झाले नाही. असे असतानाही एमआयटीने या दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले लाखो रुपये परत न केल्याने अखेर विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरुड येथील आवारात ‘विमान उडाव आंदोलन’ करण्यात आले. (police took students in custody who are Doing Protest by against MIT)
एमआयटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी हा दौरा आयोजित केला जातो. यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये घेतले जातात. परंतु शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा झाला नाही. मात्र, तरी देखील आभियांत्रिकी, बीबीए आणि अर्थशास्त्र विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांच्या हप्त्याने तब्बल दोन लाख रुपये घेण्यात आले होते. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने अभ्यास दौरा कालातंराने (विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर) आयोजित केला जाईल, विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठातील काही प्रशस्तीपत्र अभ्यासक्रम करता येईल किंवा शुल्कामध्ये समायोजित केला जाईल, असे पर्याय संस्थेने दिले होते. परंतु शुल्क परत करण्याबाबत कोणत्याही हालचाली आतापर्यंत केल्या नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
या काळात विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयील शुल्क भरणे अवघड वाटत आहे त्यात या दौऱ्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसुल केले जात असल्याचा निषेध आंदोलनात व्यक्त करण्यात आला. दरम्यान आंदोलनात सहभागी झालेले परिषदेचे प्रदेश सह मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांच्यासह जवळपास १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचे कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी सांगितले.
‘‘एमआईटीच्या बीटेक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही पुढील तीन वर्षात अभ्यास दौरा होऊ शकेल, नामांकित परदेशी विद्यापीठातील ऑनलाइन कोर्स करता येईल आणि वरील दोन्ही पर्याय मान्य नसल्यास विद्यार्थ्यांचे पैसे परत करायचे, असे तीन पर्याय २० दिवसांपूर्वी दिले आहेत. यावर पालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कायकर्ते ‘एमआयटी’ला नाहक बदनाम करत आहेत. या विषयी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विस्तृत चौकशी करावी.’’
- डॉ. प्रसाद खांडेकर, अधिष्ठाता, आभियांत्रिकी विभाग, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.