पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे आता भाजपकडून थेट शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेतले आहे. यामुळे राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा विरोधकांना महाविकास आघाडीच्या सरकारला घेरण्याची संधी मिळाली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा संबंध विदर्भातील एका मंत्र्यांशी असल्याची चर्चा राज्यात सुरु होती. यात एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती.
गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणी विदर्भातील मंत्र्यांचे कनेक्शन असल्याची चर्चा केली जात होती. मात्र उघडपणे कोणत्याच नेत्यांनी नाव घेतले नव्हते. भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विटरवरून आक्रमकपणे शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याच्या प्रकरणात दबंगिरी सहन केली. त्यावर शांत बसले पण आता पक्षातल्याच मंत्र्याची राठोडगिरी सहन करणार का? असा प्रश्न विचारला.
आत्महत्या प्रकऱणात आता भाजपने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच नाव घेतलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत अनेक आरोप केले आहेत. यामध्ये राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी त्यांनी यामध्ये केली आहे.
चित्रा वाघ यांच्याकडून थेट आरोप
चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.
ऑडिओ क्लिपमुळे संशय
दरम्यान, या प्रकरणात एक कॉल रेकॉर्डची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यावरून या प्रकरणात हत्या की आत्महत्या याचा तपास केला जात आहे. अद्याप ही क्लिप खरी की खोटी हे समोर आलेलं नाही. तसंच मंत्री संजय राठोड यांच्याकडूनही कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता भाजपकडून थेट नाव घेतल्यानंतर ते काय बोलतील हे महत्त्वाचं ठरणार आहे. संजय राठोड यांच्याकडे वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्यांचा पदभार आहे.
कोण होती पूजा?
मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील असलेली पूजा सोशल मीडियावर सक्रीय होती. टिकटॉक वर तिचे फॅन फॉलोअर्स खूप होते. बंजारा समाजाची असलेली पूजा ही समाजाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असायची. याआधी ती माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबतही दिसली होती. तसंच शिवसेनेचे यवतमाळचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.