Latest Maharashtra News: मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची सोमवारी (ता. २२) येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी खेडकर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली.
न्यायालयाने शनिवारी (ता. १९) मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती. कोठडीची मुदत संपल्याने खेडकर यांना पौड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने खेडकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. दरम्यान, खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयात अर्ज केला आहे.
मुळशीत शेतकऱ्याला धमकाविल्याप्रकरणी खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना शस्त्रपरवाना रद्द का करू नये, अशी नोटीसही बजाविली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.