Latest Pune News : बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा बांधकाम व्यावसायीक मित्र आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याने डॉ. अजय तावरेशी ओळख काढली होती. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला.
अग्रवालच्या सांगण्यावरून त्यांचा मित्र राजू याने त्याचा चालक मनीषकडे अमर गायकवाड आणि अश्पाक मकानदार यांना देण्यासाठी चार लाख रुपये दिले होते, अशी माहिती युक्तिवादात कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सोमवारी (ता.१२) न्यायालयात दिली.
या गुन्ह्यात ससूनमधील एका अधिकाऱ्याच्या जबाबामध्ये महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. पोर्शे कार अपघाताच्या बातम्या टीव्हीवर पाहिल्यानंतर ससूनमधील एका विभागाचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलाच्या टेस्टचे अहवाल मागविले होते.
त्यामध्ये मुलाचे शारीरिक स्वरूप व्यवस्थित असल्याचा अहवाल डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी दिला होता. याबाबत डॉ. हाळनोर यांना अधिकाऱ्याने विचारले असता त्याने सांगितले होते की, ‘‘अपघात मध्यरात्री अडीच वाजता झाला होता. मुलांना दुपारी रूग्णालयात हजर केले होते. त्यामुळे त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या.’’ मात्र काहीतरी चुकीचे झाल्याचा संशय त्या अधिकाऱ्याला आला होता. याबाबत अधिकाऱ्याने अधिष्ठाता यांना कळवले होते. याच दरम्यान डॉ. हाळनोर त्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करत होता. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव आणला असल्याचे त्याने अधिकाऱ्याला सांगितले.
तसेच अल्पवयीन मुलगा माझे वडील तुम्हाला हवे तेवढे पैसे देतील. आमचे करिअर खराब होईल. आम्हाला वाचवा अशी विनवणी करत असल्याचे देखील डॉ. हाळनोर याने अधिकाऱ्याला सांगितले होते, अशी माहिती ॲड. हिरे यांनी न्यायालयास दिली.
कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल , अमर गायकवाड आणि अश्पाक मकानदार येरवडा कारागृहात आहेत.
त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या जामिनास विरोध करताना विविध मुद्दे ॲड. हिरे यांनी मांडले. जामीन अर्जावर सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून पुढील तारखेला बचाव पक्षाचा युक्तिवाद होणार आहे. पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे. या प्रकरणात बचाव पक्षाच्यावतीने अँड. हर्षद निंबाळकर, अॅड. सुधीर शहा, अॅड. ऋषीकेश गानू, अॅड. प्रसाद कुलकर्णी आणि अॅड. सत्यम निंबाळकर हे काम पाहत आहेत.
अपघाताच्या दिवशी अल्पवयीन मुलासोबत असलेल्या चालकाला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाचा मोबाईल काढून घेतला. तसेच त्याला डांबून ठेवले होते, असे अॅड. हिरे यांनी न्यायालयाला सांगितले. तर अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड हे शेवटपर्यंत न्याययंत्रणेच्या हाताला काही लागू नये, यासाठी प्रयत्न करत होते, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.