कायद्यासमोर गरीब-श्रीमंत सारखेच; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची स्पष्टोक्ती; कठोर शिक्षेसाठी प्रयत्न

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत.Sakal
Updated on

पोलिस आयुक्तांशी संवाद...कल्याणीनगरमधील १९ मे रोजी पहाटे झालेल्या अपघातात दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीचा बळी गेला. त्याचे पुणे शहरातच नव्हे, तर देशभरात तीव्र पडसाद उमटले. पोलिस प्रशासन आणि इतर यंत्रणांनी निष्काळजीपणा केल्याबाबत नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी साधलेला संवाद.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत. पुणे शहर पोलिस दलाकडून गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला गेला नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. पोलिस कायद्याच्या मार्गाने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करतील. याबाबत नागरिकांनी पोलिसांविषयी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

प्रश्‍न : मोटारीत नेमके किती जण होते, गाडी कोण चालवत होते?

उत्तर : गाडीत अल्पवयीन आरोपीसह त्याचे दोन मित्र आणि मोटारीचा चालक होता. अल्पवयीन मुलगाच मोटार चालवत होता. घरातून बाहेर पडताना सुरक्षारक्षकाकडील रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे. अपघातापूर्वीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात त्याने मद्यसेवन केल्याचे आणि गाडी तोच चालवत असल्याचे दिसून येत आहे.

अपघातानंतर गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला?

- अपघातापूर्वी मुलगा गाडी चालविण्याचा हट्ट करीत होता. याबाबत चालकाने मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कळविले. परंतु वडिलांनी मुलाला गाडी चालवू द्या, असे सांगितले. त्यामुळे चालकाने मुलाला गाडी चालविण्यास दिली.

तसेच वडिलांकडून अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडिलांवर यापूर्वी बाल न्याय कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात कलम २०१ ची वाढ करण्यात येणार आहे.

अपघातानंतर आरोपीच्या वैद्यकीय चाचणीस विलंब झाला?

- आरोपीला रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास ससून रुग्णालयात नेण्यात आले. पुन्हा सायंकाळी रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. दोन्ही नमुने एकाच व्यक्तीचे आहेत का, हे तपासण्यात येणार आहे. ‘फॉरेन्सिक’ विभागाकडून अहवाल आल्यानंतर मद्य सेवन केले की नाही स्पष्ट होईल.

या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आल्याची चर्चा आहे.

- अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी मुलाऐवजी चालकच मोटार चालवत होता, असा पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तसे केले नाही. राजकीय दबावामुळे पोलिस ‘मॅनेज’ झाले असते तर चालकावर गुन्हा दाखल केला असता. त्यामुळे राजकीय दबावाचा प्रश्नच येत नाही.

पबचालकांवर कठोर कारवाई करणार?

- पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून माझा पब संस्कृतीवर आक्षेप होता. पब पहाटे पाच वाजेपर्यंत चालत होते. त्यांची वेळ रात्री दीड वाजेपर्यंत नियंत्रित केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार आणि रूफटॉप हॉटेलमुळे होणाऱ्या त्रासाला नागरिक वैतागले आहेत. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.

तसेच अल्पवयीन मुलांना मद्य पुरविणाऱ्या पब, बारच्या चालकांवर कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक पोलिसांना ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वाढत्या पब संस्कृतीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करणार आहात?

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पब संस्कृतीवर नियंत्रण आणण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पोलिस, जिल्हा प्रशासन, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करीत आहेत. याबाबत राज्य सरकारला अहवाल दिला जाणार आहे.

या अपघात प्रकरणात मुलाच्या आजोबांची भूमिका काय?

- अपघातग्रस्त गाडी ब्रह्मा कॉर्पोरेशनच्या नावावर आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा आणि आजी त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष सहभाग ३०४ च्या गुन्ह्यात नाही. परंतु त्या संचालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे.

पबच्या मालकांवर कारवाई नाही.

- पबचालकावर कारवाई करण्यात आली आहे. ब्लॅक पबच्या एफएल ३ चा परवाना चोरडिया ब्रदर्सच्या नावाने आहे. परंतु त्यांनी तो दुसऱ्यास चालविण्यास दिला होता. कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

कायदा सर्वसामान्यांना लागू, श्रीमंतांना नाही, अशी नागरिकांत भावना आहे.

- पोलिसांनी पहिल्याच दिवशी सर्व आरोपींवर कारवाई केली आहे. जनतेला संभ्रमात राहण्याची गरज नाही. दोषी व्यक्तींना पाठीशी घातले जाणार नाही. गरीब किंवा श्रीमंतासाठी कायदा एकच आहे. त्याच भावनेने पुणे पोलिस काम करीत आहेत.

माहिती न कळविण्याची पोलिसांची गंभीर चूक

अपघातानंतर येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध सकाळी गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तसे न करता गंभीर चूक केली आहे. आम्हाला या घटनेची माहिती सकाळी नऊच्या सुमारास मिळाली. मात्र पोलिसांनी अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि पबचालकांविरुद्ध पहिल्याच दिवशी गुन्हा दाखल केला.

दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले?

  • अपघातानंतर पहिला गुन्हा सकाळी सव्वाआठच्या सुमारास कलम ३०४ (अ) नुसार दाखल केला.

  • घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर आरोपीवर कठोर शिक्षेची तरतूद असलेले कलम ३०४ लावण्यात आले.

  • न्यायालयात जाण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली.

  • तसेच अल्पवयीन आरोपीला गाडी चालविण्यास दिल्याप्रकरणी आणि अल्पवयीन मुलांना दारू पिण्यास दिल्याप्रकरणी बाल न्याय कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींवर सबळ पुराव्यांसह न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल आणि बळी गेलेल्या तरुण- तरुणीला न्याय मिळेल. या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.