पुणे - संदेशवहनासाठी इंटरनेट क्रांती वरदान ठरली असली, तरी एकेकाळी आघाडीवर असणाऱ्या टपाल खात्यासाठी मात्र ती शापित ठरली आहे. ई-मेलसह अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणार्धात संदेशवहन होत असल्याने या खात्यावर संक्रांत आली आहे. परिणामी, शहरांसह गावोगावी दिसणाऱ्या लाल रंगाच्या टपालपेट्याही इतिहासजमा होऊ लागल्या आहेत.
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतात १६८८ मध्ये मुंबई व मद्रास येथे टपालव्यवस्थेची सुरुवात झाली. तत्कालीन समाजव्यवस्थेत संदेशवहनासाठी टपाल खाते महत्त्वाचा दुवा ठरला होते.
माहितीची देवाण-घेवाण, ख्याली-खुशाली कळविण्यासाठी पोस्टकार्डे, आंतर्देशीय पत्रांचा वापर केला जायचा. ती पत्रे पोस्टमन घरोघरी पोचवायचा. मग ते घर एखाद्या दुर्गम भागातील वाडीवस्तीवर का असेना. ही सेवा पोस्टमन इमानेइतबारे करीत असे. तो आला, की त्याच्याभोवती आबालवृद्धांचा गराडा पडायचा. ‘पोस्टमन’ म्हणून आरोळी देऊन सायकलच्या ठरावीक प्रकारे वाजविलेल्या घंटीचा आवाज ऐकला, की लोक हातातील कामे टाकून घराबाहेर येत. विशेषतः ज्या घरातील पुरुषमंडळी कामानिमित्ताने परगावी असायचे, त्यांना पोस्टमन देवदूतच वाटायचा. आजच्या ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सॲपच्या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पोस्टाचा वापर किती लोक करतात, हा कुतूहलाचा विषय आहे. चौकाचौकांत लटकलेल्या टपालपेट्या दिसेनाशा झाल्या आहेत. दहा पैशांना मिळणारे पोस्टकार्ड, पंचवीस पैशांचे आंतरर्देशी पत्र आता क्वचितच पाहायला मिळतात. टपालच नसल्याने पोस्टमनच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.
डी. वाय. पाटील महाविद्यालयात मी वास्तुकलेचे शिक्षण घेत आहे. आत्तापर्यंत पत्रव्यवहार करण्याचा प्रसंगच आला नाही. पोस्टकार्ड, आंतर्देशीय पत्रे पाहिली आहेत; पण व्हॉट्सॲप, ई-मेलमुळे कुणाला पत्र पाठविण्याचा योगच आला नाही.
- नीलेश लोणकर, विद्यार्थी
पूर्वी पोत्याने टपाल गोळा करीत असे. आता वीस-पंचवीस पत्रे हातात घेऊन येतो. दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंढवा, केशवनगर परिसरात अवघी एक टपालपेटी आहे.
- संजय देडगे, पोस्टमन, मुंढवा टपाल कार्यालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.